

ठाणे : ठाणे महापालिकेच्या १३१ जागांसाठी ६४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून आज (बुधवारी) १६ लाख ४९ हजार ८६९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दिवस - रात्र ठराविक मतदार आणि गृहसंकुलांचे पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींच्या गाठी-भेटी तसेच प्रभावी नेत्यांशी बोलणे करून देत आश्वासनांचा पाऊस पाडून मतदान करण्याचे आवाहन सर्वच उमेदवारांनी केले. तसेच भरारी पथक आणि पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. गेल्या निवडणुकीत झालेल्या ५८.०८ टक्के मतदानापेक्षा अधिक मतदान कसे होईल, याकडे सर्व पक्षीय कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.
ठाणे महापालिकेच्या १३१ जागांपैकी सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ३३ प्रभागातील १२५ जागांसाठी १५ जानेवारीला २ हजार १३ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ११ विभागांमध्ये ४५ ठिकाणी एकूण ३०५ संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे असून या ठिकाणी एकूण ७०१ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पालिकेत १६ हजार ४९ हजार ८६९ मतदार असून त्यामध्ये ८ लाख ६३ हजार ८७८ पुरुष आणि ७ लाख ८५ हजार ८३० स्त्री मतदार आहेत. १५९ तृतीय पंथीय मतदार आहेत.
निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना ७९ जागा, भाजप ४० जागा, उबाठा ६६, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ३५, काँग्रेस ६७, वंचित १०, बहुजन समाजवादी पार्टी १२, एमआयएम १२ जागा, आप २२ उमेदवार आणि अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावता आहेत. अनेक प्रभागात तिहेरी, चौरंगी लढती होणार असल्याने उमेदवार आणि त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रात्रभर भेटीगाठी घेत मतदारांना मतदार केंद्रापर्यंत कसे पोचवायचे याचे नियोजन केले.
ठाण्यात शिवसेना - भाजप महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांविरोधात लढत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढत आहेत. लहान पक्ष देखील आपले नशीब आजमावत आहे. शिवसेना - भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी लढतीत रंग भरली आहे.
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, माजी खासदार आनंद परांजपे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
या निवडणूक रिंगणात १०० पेक्षा अधिक माजी नगरसेवक उतरले असून त्यामध्ये दोन माजी महापौर, दोन माजी उपमहापौर, सहा माजी सभापती आणि दहा माजी विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांचा भाऊ राजेंद्र फाटक, माजी खासदार राजन विचारे यांची पत्नी नंदिनी विचारे, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची पत्नी सुचिता पाटणकर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी सभापती संजय वाघुले, राजन किणे, महेंद्र कोमुर्लेकर, माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिला किणे, मिलिंद पाटील, एनसीपीचे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, प्रकाश बर्डे, अनिता गौरी, मनोज शिंदे तसेच माजी नगरसेवक योगेश जानकर आणि त्याची पत्नी, सिद्धार्थ ओवळेकर, सुनेश जोशी, अमित सरय्या, उमेश पाटील, पवन कदम, भूषण भोईर, मधुकर पावशे, विकास पाटील, कृष्णा पाटील, माहेश्वरी तरे, अभिजित पवार, भरत चव्हाण, सुधीर कोकाटे, सुशांत सूर्यराव, शैलेश पाटील, बाबाजी पाटील, शानू पठाण, अनिता किणे आदींच्या प्रभागातील लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.