

ठाणे : प्रवीण सोनवणे
ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग म्हणजे हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “अतिक्रमण विभागात बदलीसाठी पाच कोटी रुपये द्यावे लागतात,” असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आयोजित जनता दरबारात आव्हाड यांनी महापालिका आणि सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. "ठाणे शहराचे नेतृत्व करणाऱ्यांना दूरदृष्टी नाही. ना स्वतःचे डम्पिंग ग्राउंड, ना धरण, ना सांडपाण्याची व्यवस्था. क्लस्टर योजनेसुद्धा अपयशी आहे," अशी खरमरीत टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबारात केली.
क्लस्टर योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मानपाडा परिसरात 80 नागरिकांचा विरोध असतानाही जबरदस्तीने योजना लादली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. "मोठ्या घरांमध्ये राहणारे नागरिक क्लस्टरमध्ये का सहभागी होतील? आतापर्यंत यशस्वी झालेल्या योजनांचा हिशोब कुठे आहे?" असा सवाल त्यांनी केला.
एसआरए योजना बंद असून, ती जबरदस्तीने क्लस्टर योजनेत समाविष्ट केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “दोन हजार कोटींचे रस्ते बांधले जातात पण ठाणेकरांसाठी धरण का उभारले जात नाही?” असा सवाल उपस्थित करत पाण्याच्या संकटावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
"विकासकांना ओसी देताना नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी दिली जाते. जर ते पाणी देऊ शकत नसतील, तर त्यांना ओसी का दिले जाते?” अशी विचारणा करत पुढे नवीन बांधकामांना ओसी देणे थांबवण्याची मागणीही त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली.
ठाण्यात जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले असल्याची बाबही आव्हाड यांनी यावेळी उघड केली. "एका मागासवर्गीय महिलेच्या बाजूने न्यायालयाचा व महापालिकेचा निकाल लागूनही अहमद पठाण नामक व्यक्तीने तिची जमीन बळकावली. पोलिसही काही करत नाहीत. जर न्याय मिळाला नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने ताबा घेऊ," असा थेट इशाराही आव्हाड यांनी जनता दरबारात दिला आहे.