TMC contract fraud : ठाणे महापालिकेत टेंडर घोटाळा
ठाणे : ठाणे महानगरपालिकेत कामाच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता आढळून आली असून शासनाच्या स्पष्ट आदेशांना केराची टोपली दाखवत अधिकार्यांनी टेंडर कालावधीत फेरफार केल्याचे उघड झाले आहे. विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी ही पद्धतशीर मोडतोड केल्याचा आरोप करण्यात येत असून वर्तक नगर, वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर प्रभाग समित्यांचे अधिकारी या प्रकरणात अग्रस्थानी असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.
राज्य शासनाने विविध विकासकामांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि दर्जेदार काम होण्यासाठी स्पष्ट अटी व शर्तींसह टेंडर प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक कामाच्या स्वरूपानुसार आणि अंदाजपत्रकाच्या मूल्याप्रमाणे टेंडर कालावधी निश्चित करण्यात येतो. मात्र, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक कामांमध्ये अधिकारी मनमानीपणे टेंडरचा कालावधी बदलत असून, यामुळे काही खास ठेकेदारांना अवाजवी फायदा मिळत आहे.
विशेष म्हणजे हे घोटाळे एखाद्या एकट्या विभागापुरते मर्यादित नसून विविध प्रभाग समित्यांमध्ये राबवण्यात येणार्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये हेच प्रकार सुरू असल्याचे माहितीमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे घोटाळे हा केवळ निष्काळजीपणा नसून एक नियोजित आर्थिक गैरव्यवहार असल्याचे आरोप होत आहेत.
महिंद्रकर यांनी महापालिका आयुक्तांना यासंदर्भात त्वरित चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे ठाणे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेतील अधिकारी टेंडर प्रक्रियेत फेरफार करून, शासनाच्या आदेशांना दुजोरा न देता जनतेच्या पैशांचा दुरुपयोग केला जात आहे.
महापालिकेत मोठ्या प्रमाणावर टेंडर घोटाळा सुरू असून नगर अभियंतेच यामागील मुख्य सूत्रधार आहेत. शासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून, विशिष्ट ठेकेदारांना पोसण्यासाठी टेंडर कालावधीत फेरबदल करण्यात येत आहेत. संबंधित प्रभाग समित्यांचे अधिकारीदेखील या साखळीत सामील असून, त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे यंत्रणेत पारदर्शकता राहिलेली नाही.
स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग, मनसे

