Thane News | ठाणे महापालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

TMC News: उघड्यावरून कचर्‍याची वाहतूक; कचरा वाहणारी ठेकेदारांची वाहनेही नादुरुस्त
Thane Municipal Corporation
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या ठेकेदारांकडून होणारी कचर्‍याची वाहतूक pudhari news network

ठाणे : शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍याची वाहतूक ही हवाबंद स्वरूपात करणे बंधनकारक असताना ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) माध्यमातून नेमण्यात आलेल्या ठेकेदारांकडून मात्र या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी सफाई कामगार आणि या गाड्यांवर काम करणार्‍या कामगारांकडून करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून कचर्‍याची वाहतूक उघडयावर होत असताना ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभाग करतो काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे ज्या वाहनांमधून ही वाहतूक केली जाते त्यातील बरीच वाहने ही नादुरुस्त असल्याच्याही कामगारांच्या तक्रारी आहेत.

Summary

‘स्वस्च्छ ठाणे, सुंदर ठाणे’, ‘ठाणे बदलतंय’ अशा मोठमोठ्या संकल्पना राबवणार्‍या आणि स्वच्छतेचे अनेक पुरस्कार घेणार्‍या ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचाच कारभार चव्हाट्यावर आला आहे. हे सत्य इतर कोणी आणले नसून ठेकेदारामार्फत नेमण्यात आलेल्या कामगारांकडूनच ही गंभीर बाब उघड झाली आहे. (Thane Municipal Corporation)

मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा.लि. या ठेकेदाराला ठाणे महापालिकेच्या कचरा वाहतुकीचे काम देण्यात आले आहे. 2021 पर्यंत हवाबंद स्वरूपात कचर्‍याची वाहतूक केली जात होती. मात्र त्यानंतर सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून बालाजी ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून डंपर आणि पोकलेनच्या साहाय्याने उघडयावर ही वाहतूक केली जात असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. केवळ आर्थिक लाभासाठी सबकॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.

बालाजी ट्रान्सपोर्टकडे सुरुवातीला 9 ते 10 वाहने होती. मात्र आता 4 ते 5 वाहने असून ती देखील नादुरुस्त आणि आरटीओच्या नियमाप्रमाणे नियमबाह्य असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. सी.पी तलाव ते डम्पिंग पर्यंत ही वाहतूक करावी लागत असल्याने मध्येच वाहने बंद देखील पडत आहेत. याशिवाय अशाप्रकारे उघड्यावर कचर्‍याची वाहतूक करण्यात येत असल्याने ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून याविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Thane Municipal Corporation)

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

घंटागाडी चालक आणि सफाई कामगार यांना दररोज तीन तास अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे ठेकेदार आणि कामगारांमध्ये नेहमी वाद होत असल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. सी.पी तलाव या ठिकाणी दररोज एक ते दोन किमीच्या रांगा लागत असून यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. कामगारांवर अन्याय करणार्‍या आणि ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आली असल्याची माहिती ठा.म.पा युनियन अध्यक्ष किरण कांबळे यांनी दिली आहे.

श्रमजीवी संघटनेचे ठाणे पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन

कचरा वाहून नेणार्‍या गाड्या वारंवार बंद पडत असल्याने याचा परिणाम कामगारांच्या कामावर देखील होत असून कामगारांना यामुळे अतिरिक्त काम करावे लागत आहे. मात्र याचा साधा मोबदला देखील कामगारांना मिळत नसून नियमित वेतन देखील होत नसल्याने संतापलेल्या कामगारांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयाच्या बाहेर ठिय्या दिला. जून महिन्याचे वेतन नसल्याने 55 कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली नाही तर यापूढे कुटुंबियांसोबत आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news