डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीकडे रेतीबंदर रोडला असलेल्या गावदेवी मंदीर ते सत्यवान चौक दरम्यानच्या गावदेवी मंदिर मैदानाजवळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बगिचा आरक्षण भूखंडावर भूमाफियांनी नाकावर टिच्चून तब्बल सात मजली बेकायदा इमारत उभी केली आहे. या इमारतीमधील सदनिका खरेदीदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून भूमाफियांनी खरेदीदारांची फसवणूक सुरू केल्याची तक्रार उमेशनगरमधील एका रहिवाशाने केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्याकडे केली आहे. त्यामुळे अशा इमारतीत सदनिका खरेदी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे.
या रहिवाशाने निवेदनाच्या प्रती राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, केडीएमसी नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक दीक्षा सावंत, ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना देण्यात आल्या आहेत. ही बेकायदा इमारत केडीएमसीने यापूर्वीच अनधिकृत घोषित केली आहे. बगिचाच्या आरक्षणावरील ही इमारत जमीनदोस्त करावी, यासाठी आपण सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत. ह प्रभाग कार्यालयाकडून दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे. या बेकायदा इमारतीला अधिकारी पाठबळ देत असल्याचा आरोपी तक्रारदार संजय म्हात्रे यांनी केला. केडीएमसीची बनावट बांधकाम कागदपत्रे, तसेच महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून सात मजल्यांच्या या बेकायदा इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी पध्दतीने या इमारतीमधील सदनिका भूमाफिया खरेदीदारांना विक्री करत असल्याचा गौप्यस्फोट तक्रारदार म्हात्रे यांनी केला. या इमारतीवर भुईसपाट करण्याची कारवाई प्रशासनाने करावी. अन्यथा आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी दिला.
देवीचापाडा गावदेवी मंदिराजवळ उभारलेल्या बेकायदा इमारतीची माहिती घेतो. ही इमारत यापूर्वीच अनधिकृत म्हणून घोषित केली आहे की नाही याविषयी खात्री करतो. ही इमारत आरक्षित भूखंडावर उभी असेल तर आयुक्तांच्या आदेशांवरून ही इमारत भुईसपाट करण्यात येईल. याशिवाय, राहुलनगरमधील दोन्ही बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे.
राजेश सावंत, प्रभागाचे सहाय्यक आयुक्त
या बेकायदा इमारतीपासून 100 फुटावर राहुलनगरमध्ये दोन बेकायदा इमारती भूमाफियांनी उभारल्या आहेत. या इमारतींवरही केडीएमसीकडून कारवाई केली जात नाही. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी यात लक्ष घालून गावदेवी मंदिराजवळील सात मजली इमारत आणि राहुलनगरमधील दोन्ही इमारती भुईसपाट करण्यासाठी अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त आणि ह प्रभागातील अधिकार्यांना आदेश देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडूनही करण्यात येत आहे. या संदर्भात उघड बोलल्यास त्रास होण्याच्या भीतीपोटी कुणीही रहिवासी उघडपणे बोलत नाही.