बदलापूर: पुढारी वृत्तसेवा : बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. राज ठाकरे हा प्रकार घडला तेव्हा विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुटुंबीयांशी संवाद साधला होता. त्यानंतर आज (दि. २८) ते बदलापूरमध्ये दाखल झाले होते. परंतु ते संवाद न साधता निघून गेले. (Raj Thackeray)
या घटनेनंतर बदलापूर शहरात झालेल्या बंद आणि रेल रोको व शाळेसमोरील आंदोलनानंतर अनेक स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व उत्स्फूर्त आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी या आंदोलकांना घरी जाऊन धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे 26 तारखेला आंदोलनात सहभागी असलेल्या पालक आणि बदलापूरकरांची संवाद साधण्यासाठी येणार होते. मात्र 26 तारखेला नियोजित केलेला त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या उलट सुलट चर्चानंतर राज ठाकरे हे आज (दि. 28) बदलापुरात दाखल झाले. (Raj Thackeray)
त्यानुसार राज ठाकरे दुपारी पावणे एकच्या सुमारास बदलापुरात दाखल झाले. नियोजित कार्यक्रम स्थळी आल्यानंतर अर्ध्याहून रिकामा हॉल राज ठाकरे यांनी बघितला. त्यानंतर ते थेट पुढच्या बाजूला असलेल्या काही महिलांची बोलले. तसेच या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या व ज्या महिला पत्रकारांविरोधात शिवसेनेचे स्थानिक नेते वामन म्हात्रे यांनी अर्व्वाच्च भाषेत केलेल्या टीके संदर्भातील महिला पत्रकारांची ते बोलले. त्यानंतर या प्रकरणात स्थानिक पोलिसांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी म्हणून राज ठाकरे परत फिरले, ते परत आलेच नाहीत. त्यांनी तडक मुंबईचा रस्ता गाठला. (Raj Thackeray)
त्यामुळे सकाळपासून ताटकळत बसलेले पालक आणि बदलापूरकर व मनसेचे पदाधिकारी यांच्यात संवाद झालाच नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलित काय ? असा प्रश्न राज ठाकरे निघून गेल्यानंतर सर्वसामान्य बदलापूरकर विचारत होते. तर मनसेच्या स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे चेहरे बरंच काही सांगून जात होते.