

डोंबिवली : कल्याण आणि परिसरात गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असतानाच ही दुर्दैवी घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी चिंता व्यक्त करत मुलीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, याकडे पोलिसांचे लक्ष वेधले आहे.
कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात आपल्या पालकांच्या समवेत राहणारी शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता झाली. या मुलीचा मृतदेह पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जनस्थळी आढळून आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तिची निर्घृण हत्या करण्यात आली असून तिच्यावर अत्याचार केला असावा, असा कयास आहे. मुलीच्या हत्येच्या हृदयद्रावक घटनेमुळे कल्याण शहर हादरले आहे. कल्याण पूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड या ॲक्शन मोडवर आल्या आहेत.
मंगळवारी सायंकाळी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत आमदार गायकवाड यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी या गंभीर घटनेतील आरोपीला लवकर अटक करण्यासह, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर कोळसेवाडी पोलिस ठाण्यांतर्गत बंद असलेल्या पोलिसांच्या चौक्या देखील पुन्हा सुरू कराव्यात. तसेच परिसरात पोलिसांच्या गस्ती वाढवाव्यात, अशी मागणी आमदार गायकवाड यांनी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे केली.