

ठाणे : मुंबईतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणातील दोन कंपन्यांना ठाणे महापालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीचे कंत्राट दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महापालिकेमध्ये कोणतेही काम देऊ नये, अशी स्पष्ट मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिकेकडे आधीच केली होती. तरीही, यातील दोन कंपन्यांनी एमएमआरडीए कडून घोडबंदर रोडवरील आनंदनगर ते माजिवडा रस्त्याच्या देखभालीचे तीन कोटींच्या कंत्राटासाठी निविदेमध्ये सहभाग घेतला आहे. अशा कंपन्यांना कंत्राट बहाल केल्यास थेट न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा पाचंगे यांनी एमएमआरडीएला दिला आहे.
मुंबई महापालिकेतील मिठी नदी गाळ प्रकरणातील 65 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या पाच भ्रष्ट ठेकेदार कंपन्यांपैकी एन.ए. कन्स्ट्रक्शन, आणि जे.आर.एस. इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांनी आनंदनगर ते माजिवडा रस्त्याच्या देखभाली करिता 3 कोटीच्या निविदेमध्ये सहभाग घेतला आहे.
या भ्रष्ट कंपन्यांनी मिठी नदी गाळ उपसण्याच्या कामांमध्ये बनावट मोजमापे, खोटे दस्तावेज आणि चुकीचे बिलिंग यांसारख्या गंभीर त्रुटी कामात केल्या असून, संबंधित प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. तरी देखील एमएमआरडीकडून ठाण्यातील महत्त्वाच्या रस्त्याच्या देखभालीकरिता देण्यात येणारे 3 कोटींचे काम या कंपन्यांना पुन्हा देणे म्हणजे जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी ठरेल, असे पाचंगे यांचे म्हणणे आहे.
मुंबई महापालिकेची फसवणूक करणार्या या कंपन्यांच्या कामावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. याबाबत एमएमआरडीए प्रशासनाने कठोर पावले उचलून वेळीच भ्रष्टाचार रोखावा. या भ्रष्ट कंपन्यांना या कामात तसेच इतर कोणत्याही कामात सहभागी करून घेऊ नये. तसेच आपण संबंधित कंपन्याना काळ्या यादीत टाकावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करिता न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा मनसेचे संदीप पाचंगे यांनी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता राठोड यांना दिला आहे.