Thane : फटाक्यांमुळे गैरप्रकार ! मंडप साहित्य बेकायदा गोदामाच्या आगीने केला घात
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली रोडला असलेल्या टिळकनगर पोलिस ठाण्याच्या मागे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा शैक्षणिक कारणासाठी आरक्षित भूखंड आहे. या भूखंडावर एका पुरवठादाराने लग्नकार्य वा सभांच्या मंडपाचे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम उभारले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मंडपाचे साहित्य ठेवण्यासाठी ठेकेदाराकडून या भूखंडाचा बेकायदा वापर सुरू होता. सोमवारी (दि.4) रोजी रात्रीच्या सुमारास फटाक्यांमुळे या गोदामाला आग लागली. त्यामधून या भूखंंडाचा वापर बेकायदा गोदामासाठी केला जात असल्याचा प्रकार उघडकीला आला.
पाथर्लीतील डोंबिवली जिमखान्या शेजारी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोटेश्वर मंदिराच्या बाजुला हे गोदाम गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शैक्षणिक सुविधेसाठी आरक्षित भूखंडावर सुरू होते. केडीएमसी प्रशासन या प्रकारापासून पूर्णतः अनभिज्ञ होते. एकाही अधिकाऱ्याला याचा थांगपत्ता नव्हता. मोक्याची जागा मंडप ठेकेदाराकडून नियमबाह्य वापरली गेल्याने केडीएमसीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान केले जात होते. केडीएमसीच्या मालमत्ता आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना या संदर्भात कोणतीही माहिती नव्हती.
दिवाळीच्या सोमवारी (दि.4) रोजी रात्री परिसरातील रहिवासी फटाके फोडत होते. त्यातील एक फटाका उडून तो शैक्षणिक भूखंडावर थाटलेल्या मंडपातील गोदामावर जाऊन पडला. या गोदामात मंडपासाठी लागणारे कपडा, फायबर, विद्युत साहित्य होते. झटकन पेट घेणाऱ्या ज्वलनशील सामानावर पेटता फटाका पडल्याने तात्काळ आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने सर्व साहित्य जळून खाक झाले. केडीएमसीच्या अग्निशमन दलाचे जवान आणि फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आजुबाजुला नागरी वस्ती असल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी मंडप ठेकेदाराला मोकळ्या भूखंडावर ठेवलेले मंडपाचे सामान आणि जमिनीच्या मालकी संदर्भात प्रश्न विचारले. मंडपाचे गोदाम केडीएमसीच्या शैक्षणिक सुविधेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर उभारल्याचे केलेल्या चौकशीतून पुढे आले. नागरी वस्ती आणि जीवितासाठी धोकादायक असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या गोदामात भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास परिसरातील मानवी वस्तीला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. ही माहिती सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त अवधूत तावडे यांना दिली.
वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशांनुसार सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी मंडप ठेकेदाराला तंबी दिली. दोन दिवसांत शैक्षणिक भूखंडावरील मंडप सामानाचे गोदाम रिकामे करण्याचे फर्मान सोडले. हे गोदाम ठेकेदाराने स्वत:हून रिकामे केले नाहीतर केडीएमसी जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करून शैक्षणिक भूखंड मोकळा करेल, अशी तंबी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी दिली आहे. गोदामाला आग लागल्यानंतर जळलेला भाग व तेथील कचरा जेसीबीच्या साह्याने फ प्रभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने साफ केला.
पाथर्लीतील शैक्षणिक सुविधेसाठी आरक्षित भूखंडावर एका मंडप ठेकेदाराने त्याचे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम उभारले होते. अनेक वर्षांपासून या जागेचा बिनबोभाट वापर करत होता. मात्र आग लागल्यामुळे हा सारा प्रकार उघडकीस आला. मात्र आता ठेकेदाराला गोदामाची आरक्षित जागा मोकळी करण्याचे आदेश दिल्याचे फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले.

