

रोहा : रोह्यातील धाटाव एमआयडीसीतील साधना नायट्रोकेम कंपनीत गुरुवारी (दि.12) रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात कंत्राटदाराचे तीन कामगार ठार झाले असून, अन्य चार कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत.
ओडीबी 2 उत्पादन धुण्यासाठी असलेल्या मिथेनॉल स्टोरेज टँकवर वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याच्या ठिणग्या (स्पार्क) मिथेनॉल स्टोरेज टँकवर पडल्याने टँकचा शक्तीशाली स्फोट होऊन आगीचा मोठा भडका उडाला. मिथेनॉल स्टोरेज टँकजवळच काम करणार्या कामगारांपैकी दिनेश कुमार खरबत राम (25, उत्तर प्रदेश), संजीत कुमार रामचंद्र यादव (21, उत्तरप्रदेश) आणि बासुकी यादव (45,बिहार) या तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.
आगीत होरपळून जखमी झालेल्या तिघांमध्ये वेल्डर सतेंद्र कुमार विजय साहू (19, रा. जैनवाडी, धाटाव, मूळ रा. उत्तर प्रदेश), निलेश काशिनाथ भगत(38, रा.लक्ष्मीखार ता रोहा ) आणि वेल्डर अनिल हार्दिष मिश्रा (44, रा.घोसाळकर अपार्टमेंट रोहा ,मूळ रा.बिहार) यांचा समावेश आहे.
या तिघांना अनुूक्रमे भट हॉस्पिटल रोहा, मेडी केअर हॉस्पिटल खारघर आणि बर्न सेन्टर ऐरोली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असल्याची माहिती कंपनीचे प्रशासकीय अधिकारी विद्याधर बेडेकर यांनी दिली.
साधना नायट्रोकेम कंपनीतील हे काम एम. के.फॅब्रिकेटर्स या कपंनीने घेतले होते. काम करत असताना कामगांरांना देणे आवश्यक सुरक्षा साधने अपुरी असल्याचे तसेच स्फोटजन्य रसायनांच्या शेजारी वेल्डींगचे काम करण्यापूर्वी घेणे आवश्यक असलेली खबरदारी घेण्यात आली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून. या प्रकरणी एम. के.फॅब्रिकेटर्स या कपंनीचे मालक मोहन लाल आणि इतर चौघे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
स्फोटाची तीव्रता प्रचंड होती की त्या आवाजाने धाटाव, बारसोली यांसह लगतच्या वस्तीतील घरांच्या खिडक्या हलल्या, त्यातून स्फोटाची भीषणता समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटाने शेजारील गावातील घरांच्या खिडक्या हालल्या, आजूबाजूच्या कंपन्या वस्तीतील घरांना चांगलाच हादरा बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटाचा आवाज येताच परिासरातीव नागरिक व अन्य कामगारांनी कंपनीसमोर एकच गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला.