

नालासोपारा : नालासोपार्यात खेळण्याच्या शुल्लक कारणावरून मराठी कुटुंबावर परप्रांतीयांचा सामूहिक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दखल केला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच मनसेचे शहर संघटक श्रीधर उर्फ रवी पाटेकर यांनी तत्काळ आचोळे पोलीस ठाण्यात भेट देवून आरोपींना कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर आचोळे पोलिसांनी कारवाई न केल्यास मनसे आपल्या पद्धतीने धडा शिकवणार असल्याचे पाटेकर यांनी सांगितले आहे.
राज नगर येथील अपार्टमेंटमध्ये इमारतीतील लहान मुले फुटबॉल खेळत होती तेव्हा अल्पवयीन मुलगा हा सगळ्या मुलांशी भांडणे करतो म्हणून त्याला खेळायला घेत नव्हते मात्र भांडण न करण्याच्या बोलीवर त्याला खेळायला घेतले, मात्र त्याने गोल न करता गोल केल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व मुलांनी आम्ही खेळणार नाही असे सांगितल्याने चिडून अल्पवयीन मुलाने फिर्यादीच्या मुलाला मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी मराठी फिर्यादी आणि त्यांचे पती गेले असता त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीचा मुलगा एकटाच घरात असताना 10 जणांनी फिर्यादींच्या दारावर लाथा मारून दार तोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 10 जाणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आचोळे पोलिसांनी त्यांना नोटीसा बजावल्या असून पुढील तपास सुरू आहे.
या पुढे मराठी माणसावर कोणत्याही परप्रांतीयांनी हल्ला केल्यास खपवून घेतले जाणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे नालासोपारा शहर संघटक श्रीधर ऊर्फ रवी पाटेकर यांनी दिला आहे.