

डोंबिवली : कुटुंबातील सदस्य एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असताना दिराने विवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्रा परिसरात उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे पती देखील मोबाईलमधील अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची माहिती विवाहितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पती, दीर,सासू व नणंदेवर गुरूवारी (दि.१६) गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पिडीत ३० वर्षीय विवाहिता मुंब्रा भागातील एका परिसरात राहत असून तिचा विवाह कल्याण पश्चिमेतील जोशीबागेत राहणाऱ्या तरूणाशी मे २०२४ रोजी झाला होता. पती अश्लिल व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचे विवाहितेने तक्रारीमध्ये म्हटले असून याबाबत तिने सासू व नणंदेला सांगितले असता दोघांनीही तिला शिवीगाळ केली. त्यानंतर २० डिसेंबर रोजी कुटुंबातील सर्व सदस्य कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असता विवाहिता एकटी असल्याचा फायदा घेत दिरानेही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर विवाहितेने पोलिसांत धाव घेत पती, दिर, सासू, नणंद याच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिसात गुन्हा दाखल केला.