

डोंबिवली : एकीकडे मराठी शाळांचा दर्जा खालावत चालल्याची परिस्थिती कॉन्व्हेंट स्कूलने आणली आहे. मात्र दुसरीकडे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी शासन व प्रशासनाकडून खटाटोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जाऊन तेथील शिक्षकांसह विद्यार्थ्यांची संवाद साधला.
या संदर्भात सोमवारी (दि.2) कल्याणमधील महापालिकेच्या मराठी शाळांची आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी पाहणी केली. धाकटे शहाड येथील शाळा क्रमांक 33, मिलिंद नगरमधील शाळा क्रमांक 63 आणि बारावे गावातील शाळा क्रमांक 68 या तीन शाळांना त्यांनी भेटी दिल्या.
भेटी दरम्यान शाळा इमारत, वर्ग खोल्या आणि दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी शाळांच्या परिसराची पाहणी केली. यावेळी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी वर्ग सुरू असताना संवाद साधला.
शाळेच्या संदर्भात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शैक्षणिक सुविधा पुरविणे, इमारती सुसज्ज करणे, याबाबत संबंधित अधिकारी व अभियंत्यांना आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे परवानगी शिवाय रजेवर जाणाऱ्या शिक्षकांची विनावेतन रजा मंजूर करण्याबाबत, तसेच वेळेत शाळेत हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. इंदूराणी यांनी दिल्या. वेळप्रसंगी संबंधितांवर निलंबित करण्याची कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.