

बदलापूर : मुंबईतल्या एलिफंटा बोट दुर्घटनेत बदलापुरातील मंगेश केळशीकर (वय 33) यांचा मृत्यू झाला आहे. मंगेश हे नेव्हीला पुरवण्यात आलेल्या खासगी स्पीड बोटीच्या कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर होते. स्पीड बोटीच्या इंजिनाची टेस्टिंग सुरू असताना हा अपघात झाला. मंगेश यांच्या निधनामुळे केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. मंगेश यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या कुटुंबात मंगेश हेच एकमेव कमावते होते. त्यांच्या जाण्याने केळशीकर कुटुंबाचा आधार हरपला आहे. शासनाने तसेच सामाजिक संस्थांनी केळशीकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात द्यावा असे आवाहन स्थानिक रहिवाशांनी केले आहे.
मंगेश केळशीकर हे नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत. म्हणून त्यांनी स्थानिक माजी नगरसेविका वैशाली गीते यांचे पती प्रदीप गीते यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा प्रदीप गीते यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाबाबत अधिक चौकशी केली असता उरण पोलीस स्टेशनमध्ये अधिक चौकशी केल्यानंतर मंगेश केळशीकर यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले.
या माहितीनंतर कुटुंबावर दुःखाचा आघात झाला. शवविच्छेदनानंतर सकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली येथील नगरपालिकेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत मनमिळावू आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे म्हणून मंगेश केळशीकर परिसरात परिचित असल्याचे गिते यांनी सांगितले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.