

खानिवडे : बांबूच्या पर्यावरण पूरक आकर्षक राख्या आणि मानमोहक दिवाळीत लागणारे आकाश कंदील वापरण्याकडे नागरिकांचा वाढता कल बांबू हस्तकला तयार करणार्या पालघरच्या महिलांना सन्मानाचा रोजगार मिळवून देत आहेत आणि तसा रोजगार आपल्या कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून या महिला मिळवत आहेत.
हे सर्व सेवा विवेकच्या माध्यमातून ग्रामीण महिला सक्षमीकरण म्हणून राबविण्यात येणार्या मोहिमेत बांबू प्रशिक्षण दिल्याने शक्य झाले आहे . प्रशिक्षित झालेल्या या महिलांच्या बांबू हस्तकलेच्या वस्तू आता राज्यासह देशभर नावलौकिक मिळवत आहेत .यामुळे महिलांचा उत्साह दुणावला असून आता बांबू कारागीर होण्यासाठी इतर महिलांचा ओढा वाढत आहे .
यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याचा उद्धेश काही अंशी सफल होताना दिसत आहे .यंदा पर्यावरण पूरक बांबू राख्यांच्या सफलतेनंतर आता दिवाळीसाठी बांबूचे रंगीबेरंगी आकर्षक कंदील तयार केले असून मागच्या वर्षी मिळालेल्या मागणीच्या प्रतिसादानुसार बांबू कारागीर महिलांची येणार्या दिवाळीच्या तोंडावर कंदील तयार करण्यासाठी लगबग वाढली आहे . आपल्या गावात पारावर किंवा सार्वजनिक निवांत जागेवर ठराविक वेळी या महिला घोळक्याने परंतु एकोप्याने आणि खेळीमेळीत बांबू हस्तकलेचे हस्तगत केलेलं कौशल्य पणाला लावून उत्साहाने कामं करताना दिलेत आहेत.
वनवासी बहुल पालघर जिल्ह्यातील गाव खेड्यातील नागरिकांना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या हेतूने विवेक रुरल सेंटरच्या माध्यमातून करण्यात येणार्या इतर प्रयत्नांपैकी बांबू हस्तकलेत या भागातील महिलांनी मोठा प्रतिसाद देऊन सेंटरच्या भालीवली येथील प्रकल्पातून कुशल कारागिरांकडून प्रशिक्षण घेतले व स्वतः कुशल कारागीर म्हणून चांगले काम करून आपल्या संसाराला मोठा हातभार लावत आहेत. या महिलांनी हस्तकलेच्या बांबू पासून अनेक बहुविध, शोभेच्या तसेच उपयोगाच्या आकर्षक वस्तू तयार केल्या असून आता त्यांना मागणीही वाढत आहे.तर त्यांनी तयार केलेल्या बांबूच्या राख्यांचे नेते, अभिनेते , विशेष व्यक्ती यांच्यासह राज्यपालांनी देखील कौतुक केले आहे. त्यांच्या या हस्तकलेची भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाने ही दखल घेऊन त्यांना त्यांचे काम अधिक सोपे व दर्जेदार व्हावे म्हणून उपयोगी हत्यारांचे एक टुल किट देण्यात आले आहे.