ठाणे : दहीहंडी प्रमाणेच मानवी मनोरे रचण्याची कॉनकुर- 2024 ही आतंरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा स्पेन येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील गोविंदांच्या संघाने बाजी मारत आतंरराष्ट्रीय स्तरावर विजयी मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत जगभरातील 12 वेगवेगळ्या देशांमधील संघ सहभागी झाले होते. (Govinda's team from Maharashtra has emerged victorious at the international level)
दहीहंडी हा खेळ आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या साहसी खेळाच्या दर्जामुळे आणि प्रो गोविंदा सारख्या स्पर्धांमुळे सात समुद्रापार जाऊन पोहोचला आहे. स्पेन मध्येही दहीहंडी प्रमाणेच एकावर एक मानवी मनोरे रचण्याचा पारंपरिक खेळ प्रकार खेळाला जात असून, कॉनकुर इंटरनॅशनल्स ही स्पर्धा मानवी मनोरे बांधण्याच्या कलेतील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी एक आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गोविंदांचा संघ स्पेनमधील ‘डेल पेनडेस विला फ्रांका’ येथे झालेल्या ‘कॉनकुर इंटरनॅशनल्स 2024’ या स्पर्धेत सहभागी झाला होता. जगभरातील 12 देशांमधील स्पर्धकांशी सामना करत भारतीय संघाने या स्पर्धेत जागतिक पाळतीवर आपले नाव कोरले.
भारत आणि स्पेन यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ यावेळी, महाराष्ट्राच्या संघाला कॅस्टेलर्स विला फ्रांका या जगातील सर्वात यशस्वी मानवी मनोरे बांधणार्या संघासोबत सहयोग करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात दोन्ही संघांनी एकत्रित मनोरे बांधण्याचा सराव केला व एकमेकांच्या मानवी मनोरे उभारणाच्या कौशल्याचे आदान-प्रदान केले. या सहयोगामुळे भारत आणि स्पेन यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले असून, मानवी मनोरे बांधण्याच्या या कलेचे तांत्रिकदृष्ट्या आदान-प्रदान करण्यास फायदा होईल, असा विश्वास पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला.