.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली : कल्याण येथील रेतीबंदर आणि दूधनाका परिसरात दुग्ध वाढीसाठी म्हैशींवर इंजेक्शनचा मारा करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला असून कल्याणमधून ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे.
त्यामुळे दुग्ध व्यवसायात देखिल माफियागिरी चालत असल्याचे कल्याणात क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे. येथील मोठ्या प्रमाणात म्हशींचे तबेले आहेत. . या तबेल्यांतून दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र दूध वाढविण्यासाठी या तबेल्यांतील म्हशींवर चक्क इंजेक्शनचा मारा केला जात असल्याची खबर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या पथकाने कारवाई करून म्हशींसाठी बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा जप्त केला.
ऑक्सिटोसीन हे घातक इंजेक्शन दूध वाढविण्यासाठी गायी-म्हशींना दिले जाते. परंतु हे इंजेक्शन दुभत्या जनावरांसह मानवी आरोग्यास अतिशय हानीकारक आहे. कल्याण पश्चिमेतील हॉटेल परिसरात एका घरामध्ये ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा साठा असल्याची खबर कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथकाने मंगळवारी (दि.8) दुपारी घरावर छापा टाकला. या कारवाईत क्राईम ब्रँचने ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा साठा जप्त केला. पोलिसांनी मशीद सादीक खोत नामक व्यक्तीच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. हे इंजेक्शन कोणत्या तबेल्यांतून वापरले जाते? आदी चौकशी सुरू आहे.