Thane Leopard Death : भाईंदरमध्ये पकडलेला बिबट्याचा ४४ दिवसांनी मृत्यू, सॅटेलाईट कॉलरमुळे मिळाली दुर्घटनेची माहिती
ठाणे : भाईंदर येथील मानवी वस्तीमधून पकडण्यात आलेला बिबट्या ४४ दिवसांनी येऊर वनपरिक्षेत्रातील नागला राखीव वनक्षेत्रात मृत अवस्थेत आढळून आले आहे. ही माहिती बिबट्याला लावलेला सॅटेलाईट कॉलरमधून मिळालेल्या संदेशातून वन अधिकाऱ्यांना मिळाली. या बिबट्याचे शव असलेल्या परिसराचा घटनास्थळ पंचनामा नोंदविण्यात आला असून या बिबट्याची नखे, दात व इतर महत्वाचे अवयव सुस्थितीत आढळून आले आहे. शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
वन विभागाने १९ डिसेंबर २०२५ रोजी भाईंदर येथील मानवी वस्तीमधून पकडण्यात आलेल्या नर बिबट्यास वैद्यकीय तपासणीकरिता उप संचालक (दक्षिण) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या अधिनस्त क्षेत्रात ठेवण्यात आले होते. पकडलेल्या बिबट्याचे मुक्तेबाबत गठीत समितीची २२ डिसेंबररोजी बैठक होऊन त्यामध्ये चर्चेअंती समितीने बिबट्याला सॅटेलाईट कॉलर लावून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला.
त्यानुषंगाने बिबट्यास सॅटलाईट कॉलर बसवून त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर २५ डिसेंबररोजी रात्री 9.25 च्या सुमारास येऊर वनपरिक्षेत्रातील परिमंडळ नागला नियतक्षेत्र ससुनवघर सर्वे क्रमांक-58 मधील वनक्षेत्रामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये मुफ्त करण्यात आले होते. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करते वेळी सुदृढ, चपळ असल्याचे दिसून आले तसेच त्यास बसविलेले सॅटलाईट कॉलर संनियंत्रण करण्यात येत होते.
या बिबट्याचा वावर २५ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान ससूनवघर नियतक्षेत्रात सातत्याने दिसून आला होता. कॅमेरा ट्रॅपमध्ये तो शारीरिकदृष्ट्या सुदृढ दिसत होता आणि त्याने गुफा परिसरात कुत्र्याची शिकार केल्याचेही स्पष्ट झाले होते. ५ जानेवारी २०२६ रोजी नागला ट्रेलवर त्याच्या पावलांच्या खुणा आणि विष्ठा आढळून आल्याने वन विभाग त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता.
२ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी बिबट्याला लावलेल्या सॅटलाईट कॉलरचा 'मॉनिटर सिग्नल' (स्थिर स्थितीचा संकेत) प्राप्त झाला. संशय बळावल्याने येऊर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र नागला (सर्वे क्र. ७३) येथे वन अधिकारी, कर्मचारी आणि 'डब्ल्यूसीएस इंडिया'चे निकेत सुर्वे व त्यांच्या टीमने तातडीने धाव घेतली. शोध मोहिमेदरम्यान हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.
वन विभागाने पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासणीत बिबट्याचे दात, नखे आणि इतर सर्व महत्त्वाचे अवयव सुस्थितीत असल्याचे दिसून आले, ज्यामुळे शिकारीची शक्यता प्राथमिक स्तरावर नाकारता येते. नैसर्गिक प्रकाश कमी झाल्यामुळे मृतदेहाचे विच्छेदन तातडीने करता आले नाही.
पशु वैधकीय डॉ. निखिल बांगर आणि डॉ.प्रशांत गाढवे यांनी ३ फेब्रुवारीला शवविच्छेन प्रक्रिया केली असून, नमुने वैद्यकीय व तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचा कारणाबाबत निष्कर्ष काढता येईल. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून शवविच्छेन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ.जितेंद्र रामगावकर आणि वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील, उप संचालक (उत्तर) प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे

