

भिवंडी : भिवंडी शहराच्या लगत असलेले ठाण्याप्रमाणे भिवंडी देखील तलावाचे शहर होते. पण स्थानिक नागरिकांच्या दुर्लक्षाने शहरातील अनेक तलावांचे अस्तित्व गायब झाले. त्यातच भिवंडीकर नागरिकांनी विविध स्वप्ने दाखवीत विकासाच्या नावाखाली त्यावर बांधकामे केली. त्यामुळे सध्या शहरातील तलावांचे अस्तित्व केवळ पोस्टाच्या व घरगुती पत्त्यापुरता राहिले असून भिवंडीकरांना आता पाण्याच्या शोधात ठिकठिकाणी हैराण होत फिरावे लागत आहे.
एकेकाळी भिवंडीत असलेल्या मोठमोठ्या तलाव,पाण्याचे हौद आणि विहिरींमुळे मुबलक पाणी मिळत असल्याने येथील रहिवाश्याना कधी पाण्यासाठी वणवण फिरावे लागत नव्हते कि नळातून येणार्या पाण्याची वाट पाहावी लागत नसे.स्वातंत्र्यापूर्वी भिवंडीतील तरुणांनी भिवंडीकरांसाठी वर्हाळादेवी तलावाचे पाणी नळ्यांच्या कौलांद्वारे शहरातील ब्राह्मण आळीतील भीमेश्वर मंदिराजवळील हौदात आणून सोडले होते. हे पाणी वर्हाळा तलावातून सोडण्यासाठी आणि हौद भरण्यासाठी वेळ ठरलेली होती. भविष्यात जुन्या भिवंडीसाठी याच वर्हाळा तलावातून प्रथम भिवंडी नगरपरिषदे द्वारा लोखंडी पाईप लाईन टाकून नागरिकांना घरोघरी नळाद्वारे पाणी पुरविण्यात आले. त्यापूर्वी परिसरातील नागरिक अंघोळीसाठी तलावात अथवा विहीरवर गर्दी करीत होते..पण घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा होऊ लागला. तेंव्हापासून शहरातील तलाव, हौद आणि विहिरींकडे दुर्लक्ष झाले.परिणामी आज भिवंडीकर पिण्याचे पाणी विकत घेत आहेत.
वर्हाळा तलाव सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तयार केला असून सुशोभीकरणाच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.तर भादवड तलाव सुशोभीकरण करण्याचे काम सध्या सुरु आहे. शहरातील सर्व तलावांकडे पालिकेचे लक्ष्य असून नागरिकांच्या मागणी नुसार तलावात सुधारणा केल्या जात आहेत.
संदीप पाटनावर, भिवंडी महापालिका ,मुख्य अभियंता
भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय वाढीस लागल्यानंतर लोकवस्तीत वाढ झाली.सरकारी जागेवर अवैध लोकवस्ती वाढत असताना काही ठिकाणी नागरिकांनी तलावामध्ये मातीचा भराव टाकून बेकादेशीर घरे बांधली. भिवंडीतून हळूहळू तलाव नाहीसे झाले आहेत. आता तलावाचे नाव केवळ सरकारी कागदांवर पत्त्यासाठी आणि घरगुती पत्त्यासाठी वापरले जाते. महापालिकेने बहुतांश तलावांवर शाळा, सोशल हॉल, बांधले आहेत.परंतु शहरात असे अनेक तलाव आहेत,ज्यांवर लोकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. गौरीपाडा परिसरात पाच एकरांवर पसरलेल्या प्रसिद्ध धोबी तलावावर पालिकेने परशुराम टावरे स्टेडियम बांधण्यात आले आहे.मोठी स्वप्ने दाखवून बांधलेल्या स्टेडियममध्ये ना क्रीडा सुविधा आहेत ना सुरक्षा व्यवस्था आहेत. तसेच सुमारे दहा एकरांवर पसरलेल्या घुंघटनगर येथील काप तलावावर स्थानिक लोकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत.तीच अवस्था नागाव परिसरातील किडवाईनगर येथील किडवाई तलावाची आहे. येथेही लोकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून झोपड्या,इमारती, यंत्रमाग शेड बांधले आहेत. तसेच ठाणगे आळी येथील कोंडवाडा तलावावर मीनाताई ठाकरे रंगायतन हे नाट्यगृह बांधण्यात आले.ते काही वर्षांपासून बंद आहे.