म्हसा : मुरबाड तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रातील वर्षभरापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले खापरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, उद्घाटक न मिळाल्याने धुळखात पडून आहे.
गेले अनेक वर्षांपासून मंजूर असलेले खापरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जागे अभावी रखडले होते . खापरी येथे आरोग्य उपकेंद्र झाल्यास परीसरातील खापरी, कामतपाडा, वैतागवाडी, कोचरे, पडवळपाडा येथील नागरिकांना तातडीचे प्राथमिक उपचार मिळणार असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी हे जागा मिळावी म्हणून प्रयत्नशील होते खाजगीजागांचे भाव वाढल्याने अशी जागा देण्यास कोणीच तयार नसल्याने, गावालगत असलेली फॉरेस्ट खात्याची जागा मिळावी म्हणून आरोग्य अधिकारी यांनी पाठपुरावा करून ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव वनविभागाकडे पाठवून तो मंजूर करून घेतला.
या ठिकाणी उपकेंद्राची इमारत उभी केली आहे. मात्र वर्षभरापासून ही इमारत सुरु न केल्याने ती धुळखात पडून असून, इमारतीचे व्हरांड्याचे ग्रील खिळखिले झाले आहेत. तर शौचालयाच्या काचा देखील तुटल्या असून, हे उपकेंद्र लवकर सुरु केले नाही तर या इमारतीच्या एक एक भागाची नासधूस काही दिवसात फक्त खापरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे नावच फक्त कागदावर राहील. उद्घाटनासाठी कोणत्याही नेत्याची वाट न बघता ते लवकर सुरु करण्याची मागणी खापरी ग्रामपंचायतीच्या सदस्या सुरेखा राऊत व सोसायटीचे चेअरमन किशोर राऊत यांनी केली आहे.
खापरी आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधकाम पूर्ण झाले असून विद्युत पुरवठा जोडणी केली नसल्याने ते सुरु करता आलेले नाही . विद्युत पुरवठा सुरु झाला की हे उपकेंद्र लवकरात लवकर सुरु केले जाईल.
गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद ठाणे.
खापरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या विद्युत पुरवठ्याचा प्रस्ताव विद्युत वितरण कंपनीला दिलेला असून मंजूरी मिळाली का हे उपकेंद्र आरोग्य खात्याच्या ताब्यात दिले जाईल.
नितीन लाटे, ठेकेदार