खानिवडे/वाडा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दमण बनावटीच्या दारूसह गुटखा वाहतूक जोमात सुरू असतानाच आता वसई पूर्वेत लाखोंची खैर तस्करी सुरू असल्याचे उघड झाले आहे. वन विभागाने पाठलाग करत केलेल्या कारवाईत खैराचे ओंडके भरलेली दोन वाहने ताब्यात घेतली आहेत. वनविकास महामंडळ मांडवी, शिरसाड व गणेशपुरी कार्यकेंद्रातील कर्मचार्यांना यश मिळाले आहे. सापळा रचून खैरांच्या सोलीव ओंडक्यांनी भरलेली दोन वाहने या चार दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत मुद्देमालासह ताब्यात घेतली आहेत. दरम्यान वाडा तालुक्यातील जंगलावर हल्ला चढविणार्या तस्करांच्या मुसक्या कंचाड वन विभागाने बांधल्या असून खैराच्या सोलीव ओंडक्यांची वाहतूक करणार्या टेम्पो व कारला जप्त करण्यात यश आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, विरारफाटा येथील वनविकास महामंडळाच्या शिरसाड आणि मांडवी व गणेशपुरीच्या वनपरिक्षेत्रातील अधिकार्यांना 26 व 27 ऑगस्ट रोजी त्यांच्या कार्यक्षेत्रात तसेच मुंबई -अहमदाबाद महामार्गावरून वनोपज मालाची तस्करी होणार असल्याची खबर त्यांच्या गुप्त सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एम. सोनवणे,वनपाल के.व्ही.सानप, एन.के.डफडे, एम.बी.सोलंकी, जे.डी.धनगर, आर डी चव्हाण, यु.जी. बतुलवार वनरक्षक, एम.यु.जिगुरे, आर.डी.राठोड, एस.डी.गायकवाड, पी.डी.खोसरे, एस.जी.सनवारे, बी.एस.नवघरे व हेमंत भोये यांनी महामार्गावर तसेच संशयित व मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी गस्त सुरू केली होती. तसेच दोन ठिकाणी सापळा रचून संशयित वाहनाची टेहाळणी करण्याकरिता दबा धरून बसून बसले होते.
यातील पहिल्या घटनेत 26 ऑगस्ट रोजी भाताणे वनपरिमंडळ वनहददी लगतच्या गावापाड्यातील रस्त्यालगत कर्मचार्यांना अज्ञात वाहन येतांना दिसले. त्यास हातवारे व विजेरीच्या सहाय्याने थांबिण्याचा प्रयन्त केला. रस्त्यात वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक साथीदारासह जंगलात पसार झाले. मात्र त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात खैरांचे सोलीव 78 नग घ.मी.1.020 आढळून आले. त्यांची किंमत 85 हजार तसेच टेम्पो वाहन किंमत 7 लाख असा मिळून 7 लाख 85 हजारांचा मुद्देमान जप्त करण्यात आला. तर दुसर्या घटनेत 27 ऑगस्ट रोजी महामार्गावर सापळा रचलेल्या ठिकाणी अनेक संशयित वाहनांना थांबवले परंतु मध्यरात्री उलटूनही तस्करी होत असलेले वाहन न सापडल्याने त्यांचं हिरमोड झाला. परंतु गुप्त खबर ही पक्की असल्याने त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते.
दरम्यान मध्यरात्रीनंतर 2:25 वाजता अहमदाबाद - मुंबई हायवेने मुंबईच्या दिशेने येणारे अवजड सामान भरलेले वाहन दिसले .त्या वाहनाने खानिवडे टोल नाका न ओलांडता टोलनाक्याच्या लगतच असलेल्या हिमाचल पंजाब हॉटेल जवळ एका अंधार्या कोपर्यात वाहन चालू असलेल्या स्थितीत थांबविले. त्या वाहनावर वन कर्मचार्यांचा संशय बळावल्याने वाहनाच्या दिशेने जाऊन त्यास हटकले. त्यातील तस्करांना गस्ती पथक येत आहे यांची चाहूल लागल्याने वाहन चालकाने सुरूच असलेले वाहन जोरात महामार्गावर वर काढून पुन्हा आलेल्या दिशेला माघारी म्हणजेच मनोरच्या दिशेने पळविले. वन कर्मचार्यांनी सुद्धा त्याच गतीने आपले गस्ती वाहनाद्वारे थरारक पाठलाग करत वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांच्या या थरारक पाठलागात ते वाहन पुढे लागलेल्या रस्त्याच्या कडेच्या जंगल भागात चालक वाहन चालूच सोडून वाहनाच्या डाव्या बाजूने बाहेर उडी मारून जंगलाच्या दिशेने अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. कर्मचार्यांनी ते वाहन तपासणी करून ताब्यात घेतले. त्यामध्ये खैराचे सोलीव 109 नग घ.मी. 1.868 आढळून आले .त्याची शासकीय दरानुसार किंमत 22 हजार 638 तसेच 5 लाखांचे वाहन असा मुद्देमाल जप्त करून शिरसाड काष्ठ विक्री आगार, विरारफाटा येथे ठेवण्यात आला आहे.
वाडा तालुक्यातील जंगलावर हल्ला चढविणार्या तस्करांच्या मुसक्या कंचाड वन विभागाने बांधल्या असून खैराच्या सोलीव ओंडक्यांची वाहतूक करणार्या टेम्पो व कारला जप्त करण्यात यश आले आहे. वाघोटे गावाच्या हद्दीत फिल्मीस्टाईलने ही कारवाई करण्यात आली असून यामुळे जंगल तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
वाघोटे टोलनाक्याच्या परीसरात खैराची चोरटी वाहतूक होणारं असल्याची खबर कंचाड वनविभागाला लागली. परिक्षेत्र अधिकारी एस.पी. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास देखरेखीसाठी असलेली स्विफ्ट कार व खैराच्या ओंडक्यानी भरलेला टेम्पो वनविभागाने ताब्यात घेतला. चोरट्यांनी यावेळी वनविभागाच्या कर्मचार्यांवर दगडफेक देखील केली मात्र चोख प्रत्युत्तर दिल्याने अंधाराचा फायदा घेउन चोरटे फरार झाले.खैराचा जवळ्पास 75 हजारांचा माल जप्त करण्यात आला असून सोबत दोन मोठया वाहनांचीही जप्ती केल्याने चोरांचे कंबरडे मोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. वाहनांमध्ये काही कागदपत्रे आढळल्याने लवकरच आरोपींना ताब्यात घेवू असा विश्वास परिक्षेत्र अधिकारी मोहिते यांनी व्यक्त केला.