

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयातील बाजार परवाना विभागातील एका लिपिकाला लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास केडीएमसीच्या मुख्यालया शेजारी असलेल्या सुभाष मैदानावर करण्यात आली. प्रशांत धिवर असे क्लार्क पदावर कार्यरत असलेल्या या लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
या लिपिकाने घेतलेल्या लाचेची रक्कम किती होती, याचा तपशील अद्याप कळू शकला नाही. स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरच सविस्तर माहिती समोर येणार आहे. मात्र केडीएमसी मुख्यालयात लाचखोरीचे वृत्त पसरताच महापालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयातून काढता पाय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.