

कसारा : मुंबई-नाशिक रेल्वे मार्गांवरील महत्वाच्या असलेल्या उपनगरीय लोकल सेवेच्या कसारा रेल्वे स्थानकातून सुटणार्या तीन लोकल गाड्या मध्य रेल्वे प्रशासनाने पूर्वसूचना न देता रद्द केल्याने हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
मात्र लोकल सेवा बंद असल्याने प्रवासी वाहतूक करणार्या खासगी वाहन चालकांची मात्र चांदी झाली. शुक्रवारी मध्य रेल्वेने अभियांत्रिकी कामासाठी मुंबई उपनगरीय रेल्वेचे शेवटचे टोक असलेल्या कसारा व उंबरमाळी रेल्वे स्थानकावर तीन तासांचा ब्लॉक घेतला होता. परंतु अचानकच्या या ब्लॉकमुळे प्रवासी व चाकरमानी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
शुक्रवारी (दि.27) सकाळी साडे दहा वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत कसारा ते उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हर्हेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शुक्रवारी शुक्रवारी (दि.27) ब्लॉक घेण्यात आला होता. सकाळी 10 वाजून 18 मिनिटाची कसारा मुंबई सीएसटी लोकल गेल्यानंतर हा ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकमुळे 11 वाजून 10 मिनिटाची, 12 वाजून 19 मिनिटाची व दीड वाजताची मुंबई सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.
दरम्यान या ब्लॉकमुळे नाशिकहून मुंबईकडे जाणार्या मेल एक्सप्रेस गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. तर मुंबईहून नाशिक दिशेकडे जाणार्या मेल एक्स्प्रेस गाड्यांचे देखील वेळापत्रक कोलमडले होते. दरम्यान मध्य रेल्वेने घेतलेल्या या अचानकच्या ब्लॉकमुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
अनेकजण 3 तास कसारा रेल्वे स्थानकात बसून होते, तर काही प्रवाशी स्टेशन बाहेरील खासगी वाहतूकीने आसनगाव, रेल्वे स्थानकापर्यंत जाऊन पुढील प्रवास केला, मात्र खासगी वाहन चालकांनी देखील रेल्वे बंद असल्याचा फायदा घेत जादा भाडे आकारत आसनगाव, कल्याणचे भाडे आकारले.
दरम्यान मद्य रेल्वेच्या सलग दोन दिवस सुरू असलेल्या ब्लॉकमुळे उंबरमाळी ते कसारा या मार्गांवरील दोन्ही लेनवरील ओव्हरहेडच्या अभियांत्रिकी कामाला मजबुती मिळणार असल्याने सिग्नल बिघाड, ओव्हर हेड वायर तुटल्या. या नियमित घडणार्या घटना आता बंद होणार आहेत.