

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील नव्याने उभारलेल्या एसटी डेपोत बसमध्ये गर्दीतून चढत असताना एका 33 वर्षीय तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चैन भुरट्या चोराने हिसकावून पोबारा केला. गेल्या आठवड्यात सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तरूणाने दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. येथील स्थानकात भुरट्या चोरांनी थैमान मांडले असल्याने कल्याणचा एसटी डेपो चोरांना आंदण दिला काय अशी चर्चा प्रवाशांमध्ये होत आहे.
कल्याणच्या एसटी डेपोत पोलिसांच्या गस्तीसह सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही विकी कडमधाड (33) या प्रवाशाच्या गळ्यातील 45 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन भुरट्या चोराने चोरून नेल्याचा प्रकार घडल्याने प्रवाशांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नोकरदार असलेले विकी कडमधाड हे मुंबईतील गोवंडी भागात राहतात. मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सावेडी गावचे रहिवासी असलेले विकी कडमधाड यांना बुलढाला जायचे होते. त्यासाठी ते कल्याण पश्चिमेतील नवीन एसटी बस डेपोत गेले. सकाळच्या सुमारास कल्याण-बुलढाणा बसमध्ये गर्दीतून चढत होते. प्रवाशांची या बसमध्ये चढण्यासाठी चढाओढ सुरू होती. दरवाजात प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रत्येक प्रवाशाच्या हातात सामानाच्या पिशव्या आणि बसमध्ये सीट पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. विकी बसमध्ये सीटवर जाऊन बसल्यानंतर त्यांना गळ्यात सोन्याची चेन नसल्याने जाणवले. चोरट्याने बसमध्ये चढताना चेन लांबविल्याचा संशय व्यक्त करून विकी यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोत एका बसमध्ये एका तरूणीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्यातील सर्व एसटी डेपोंतील सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. एप्रिल ते मे या कालावधीत नागरिक कुटुंबासह अधिक संख्येने गावी जातात. या कालावधीत बस डेपोत भुरट्या चोरांची चंगळ असते. सुरक्षा रक्षकांनी अशा भुरट्यांवर लक्ष ठेवण्यासह गस्त वाढविण्याची मागणी प्रवासी करत आहेत.