

Drug trafficking in Kalyan and Titwala
डोंबिवली : कल्याण आणि टिटवाळा परिसरात गांजाची चोरून विक्री करणाऱ्या तीन तस्करांना पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष पथकाने सोमवारी वेगवेगळ्या भागांतून अटक केली आहे.
अटक आरोपींमध्ये एका इराणी महिलेचा समावेश आहे. या त्रिकुटाकडून लाखो रूपये किंमतीचा जवळपास दीड किलो वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याण पूर्वेकडे कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनावणे टॉवर समोरील मोकळ्या मैदानाजवळून प्रथम तुकाराम गायकवाड (२३) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो कल्याण पूर्वेकडे असलेल्या तिसगाव येथील जरीमरी मंदिर परिसरात राहतो. त्याच्याकडून एक किलोहून अधिक किंमतीचा विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरुध्द कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोळीवाडा भागात बकरी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोपाळ गणपत भिडे (४५) या इसमाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३७० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला. त्याच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबिवली-बनेली रोडला शहानवाज तेजीब हुसेन इराणी (६५) या इराणी महिलेला गांजाची तस्करी करताना अटक केली. तिच्याकडून ४५५ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. ही महिला कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी काबिल्यात राहणारी आहे.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून या तिन्ही गांजा तस्करांना कोठडीचा रस्ता दाखवला आहे.
वर्षभरापासून कल्याण-डोंबिवलीला नशामुक्त करण्याचे अभियान सुरू केले आहे. कल्याण-डोंबिवलीत दररोज अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरूध्द कारवाई सुरूच आहे. याच कारवाई दरम्यान तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.