Kalyan News | कल्याणच्या तिसगाव नाक्यावर खोदकामाचा फटका; जलवाहिनी फुटल्याने कोळसेवाडीचा पाणी पुरवठा ठप्प

संतप्त नागरिकांची महानगर गॅस कंपनीच्या निष्काळजीपणावर आगपाखड
Kalyan Kolsewadi Water Pipeline Burst
Kalyan Kolsewadi Water Pipeline BurstPudhari
Published on
Updated on

Kalyan Kolsewadi Water Pipeline Burst

डोंबिवली :
कल्याण पूर्वेतील तिसगाव नाक्यावर महानगर गॅस कंपनीकडून गॅस वाहिनी टाकण्यासाठी केलेल्या बेदरकार खोदकामाचा मोठा फटका पाणीपुरवठा व्यवस्थेला बसला आहे. खोदकामामुळे मुख्य जलवाहिनीचा ४०० मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह कमकुवत होऊन मंगळवारी मध्यरात्री फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे कोळसेवाडी जलकुंभ भरू न शकल्याने बुधवारी सकाळपासून कल्याण पूर्वेतील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. ऐन उन्हाळ्यात नळ कोरडे पडल्याने नागरिकांचे, विशेषतः गृहिणींचे हाल झाले.

तिसगाव नाक्यावरील हॉटेल प्रसादमच्या कोपऱ्याजवळ केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाची मुख्य जलवाहिनी आहे. महानगर गॅस कंपनीने गॅस लाईन टाकण्यासाठी या जलवाहिनीच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले. खोदकाम करताना जलवाहिनीजवळ आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे जलवाहिनीवरील ४०० मिमीचा व्हॉल्व्ह कमकुवत झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ नंतर हा व्हॉल्व्ह अचानक लिकेज झाला आणि मोठ्या दाबाने पाणी रस्त्यावर वाहू लागले.

Kalyan Kolsewadi Water Pipeline Burst
kalyan skywalk encroachment: कल्याणच्या ‌‘स्कायवॉक‌’वर फेरीवाल्यांचे बस्तान

मुख्य जलवाहिनीतून कोळसेवाडी येथील जलकुंभाला पाणीपुरवठा होतो. व्हॉल्व्ह फुटल्याने रात्रभर पाणी वाया गेल्यामुळे जलकुंभात अपेक्षित पाण्याचा साठा होऊ शकला नाही. त्याचा थेट परिणाम बुधवारी सकाळच्या पाणी पुरवठ्यावर झाला. कल्याण पूर्वेतील तिसगाव, कोळसेवाडी, चक्कीनाका परिसरासह अनेक भागांत नळांना पाणी आले नाही. अचानक उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे रहिवाशांची दैनंदिन कामे खोळंबली.

आठवडाभर खोदकामामुळे रहिवासी संतप्त 

विशेष म्हणजे महानगर गॅस कंपनीने आठवडाभरापूर्वी हे खोदकाम केले होते. मात्र काम झाल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती केलीच नाही. रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम नियमबाह्य असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केल्यानंतर कंपनीने काम तात्पुरते थांबवले. पण खोदलेले रस्ते तसेच ठेवल्याने वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता त्याच खोदकामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

केडीएमसीकडून युद्धपातळीवर काम सुरू

घटनेची माहिती मिळताच केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी गळतीच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. लवकरात लवकर जलवाहिनी दुरूस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Kalyan Kolsewadi Water Pipeline Burst
kalyan News : कोळसेवाडीत आईस्क्रीमच्या कोनातून बाहेर पडला तीन इंची किडा, मुलांच्या आरोग्याशी खेळ

रहिवाशांची मागणी 

महानगर गॅस कंपनीच्या निष्काळजी कारभारामुळे जलवाहिनीचे नुकसान झाले असून या भागातील रहिवाशांना, विशेषतः गृहिणींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त रहिवाशांनी केली आहे. तसेच खोदून ठेवलेले सर्व रस्ते तातडीने पूर्ववत करून रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसह पादचारी प्रवासी आणि वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news