सापाड : मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकातुन प्रवास करताना प्रवाश्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांची अडचण लक्षत घेता दोन वर्षापूर्वी फलाटावरील कार्यालये जमीनदोस्त करण्यात आली होती. पावसाळ्यापूर्वी या स्थानकाच्या दुरुस्तीची काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. मात्र आजही कल्याण स्टेशनवर अनेक समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे.
उत्तर व दक्षणि भारताला जोडणारे सर्वात मोठे जंक्शन म्हणून कल्याण रेल्वे स्थानकाला ओळखले जाते. कल्याण स्थानकमधून दररोज आठ लाख प्रवाशांची नियमित ये-जा सुरू असते. तर या कल्याण स्थानकावरून रेल्वे प्रशासनाला साधारण एक ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. इतका प्रचंड आवाका असलेल्या कल्याण स्टेशनची अवस्था मात्र बकाल व अस्वच्छ आहे. स्टेशनात सर्वत्र पसरलेली दुर्गंधीमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. स्कायवॉकच्या तुटलेल्या लाद्या आणि स्टेशनाबाहेरच चिखलाचे साम्राज्य अशा स्थितीतून दररोज कल्याणकरांना प्रवास करावा लागत आहे. कल्याण स्टेशनमध्ये एकूण आठ प्लॅटफॉर्म असून, कर्जत- कसार्याकडून येणार्या लोकल आणि बहुतेक सर्व मेल- एक्स्प्रेस गाड्या या स्टेशनात थांबतात. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची दिवस- रात्र मोठी वर्दळ असते. मात्र या मेलमुळे रेल्वे ट्रॅकमध्ये होणारी अस्वच्छतेमुळे कल्याण स्थानकात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. रेल्वेचे कर्मचार्यांकडून ट्रकची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे प्रवाशांना नाक मुठीत घेऊन लोकलची प्रतीक्षा करावी लागते.
फलाट आणि प्रवाशांच्या तुलनेत कल्याण रेल्वे स्थानकात अपुरी स्वच्छतागृहे असून, स्वच्छतेसाठी नेमलेल्या लोकांकडून स्वच्छता होण्याऐवजी ती आणखीनच बकाल बनली आहेत. स्वच्छतागृहाच्या दारातच सफाई कामगारांनी संसार मांडला असून, एखाद्या प्रवाशाने स्वच्छता नसल्यामुळे पैसे देण्यास नकार देताच त्याला बेदम मारहानीचा प्रकार देखील घडत आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहाचा वापर करण्यास अनेकजण धजावत नाहीत. याबाबत तक्रार करूनही रेल्वे पोलिस कारवाई करत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. स्टेशन परिसरातीलल गर्दुल्ल्यांचा वावर हीदेखील मोठी समस्या बनली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. येथील लाद्या उखडल्या आहेत. गर्दुल्ल्यांमुळे पसरलेली अस्वच्छता यांतून वाट काढताना प्रवाशांचा जीव मेटाकुटीला येतो. बहुतांशी स्थानकांच्या परिसरात डेब्रिज व कचर्याचे ढीग साठले आहेत. स्थानकाच्या भिंतीला तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी छताला गळती लागली आहे. त्याचबरोबर स्थानक आणि परिसरात मद्यपी व गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे.
बहुतांशी स्थानकांत अपुरी सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे गर्दुल्ले आणि भिकार्यांचे फावले आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी स्थानकांत पोलीस बळ वाढविण्याची गरज आहे.
राजनाथ कौर, प्रवाशी संघटना, ठाणे.