

नेवाळी : कल्याण महसूल विभागाने रस्त्याच्या कामात बाधा होत असल्याचे कारण देत घेसर गावातील व्यायामशाळा, अंगणवाडी आणि शौचालय जमीनदोस्त केले आहे. शासनाच्या या कारवाई विरोधात ग्रामस्थांसह भूमिपुत्रांनी देखील निषेध व्यक्त केला आहे.
अचानक झालेल्या कारवाईमुळे लहान बालकांची अंगणवाडी आता ग्रामपंचायत कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. मात्र व्यायामशाळेतील लाखोंच्या साहित्यासह शौचालय जमीनदोस्त करण्यात आले आहे. शासनाचा हागणदारीमुक्त पुरस्कार स्वीकारलेल्या घेसर गावाला शासनाच्या मोठ्या कारवाईला समोर जावे लागल्याचे दिसून येत आहे.
कल्याण तालुक्यातील घेसर गावामधून शासनाच्या 331 कोटींच्या कामांपैकी एक असलेला रस्ता जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी महसूल विभागाने गावातील व्यायामशाळा, शौचालय व अंगणवाडी जमीनदोस्त केली आहे. विशेष बाब म्हणजे गावातील व्यायामशाळा निर्माणासाठी तत्कालीन खा.आनंद परांजपे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. तर व्यायामशाळेतील लाखोंचे साहित्य बाहेर काढायला देखील महसूल विभागाने वेळ न देता थेट कारवाई केल्याने भूमिपुत्रांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात काँग्रसेचे नेते संतोष केने यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांनी कल्याण तालुका तहसीलदार सचिन शेजळ यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या वास्तूंचे पुनर्वसन करून देण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी परिसरात विकासकामांना हातभार लावला आहे. या विषयात आमदार खासदारांना ग्रामस्थांनी पत्र देऊन सूचना केल्या होत्या, आम्हाला मुदतवाढ द्यावी. व्यायाम शाळेतील साहित्य अन्यत्र स्थलांतर करण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच शौचालयही तोडण्यात आले आहे. या ठिकाणी असलेली अंगणवाडीही राहिली नाही. विषय गंभीर असताना न्यायालय देखील मुदतवाढ घेत असते. परंतु महसूल विभागाच्या अधिकार्यांनी स्थानिक वकिलांचा मुदतवाढ अर्ज स्वीकारून त्यांनी होकार दिला. मात्र ते जेवायला गेले अन् ग्रामस्थांच्या अनुपस्थितीत ही बांधकामे तोडण्यात आली. दरम्यान आमची व्यायामशाळा, शौचालय आणि अंगणवाडी परत आम्हाला हवी आहे
संतोष केणे, काँग्रेसचे प्रदेश सचिव, नेवाळी, ठाणे.