Thane Crime : कल्याण परिसरातून दोन दिवसांत पाच जण बेपत्ता

खडकपाड्यासह कोळसेवाडी पोलिसांत अपहरणाचे गुन्हे दाखल
Missing Case
बेपत्ताFile photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरातून गेल्या वर्षापासून अल्पवयीन मुलींसह नागरिक बेपत्ता होण्याची मालिका सुरूच असून पालक चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत कल्याण परिसरातून पाच जण बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी खडकपाडा आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अपहरणकर्त्यांसह अपहृतांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पहिली घटना कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळील एका सोसायटीतील आहे. अमोल चव्हाण (४५) हे २५ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजता घरातून कुणालाही न सांगता निघून गेले. मोबाईलवर चॅटिंगवरून किरकोळ वाद झाल्याने ते रागाने घराबाहेर पडल्याचे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. शोध घेऊनही ते न मिळाल्याने खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उर्वरित चार घटना कल्याण पूर्वेतील असून त्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. खडेगोळवली येथे राहणारे प्रकाश दास (वय ३८) हे बुधवारी सकाळी कामावर गेले होते. ते परत घऱी न आल्याने व त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. कल्याण पूर्वेतील एका भागात राहणारी एक १९ वर्षीय मुलगी बुधवारी सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून घरातून निघून गेली होती. ती दुपारपर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता ती महाविद्यालयात गेली नसल्याचे समजले. त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या एका परिसरात राहणारी एक २५ वर्षीय मुलगी बुधवारी सकाळी दहा वाजता घरातून निघून गेल्यापासून बेपत्ता आहे. त्यामुळे कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच नाका परिसरातील एका भागात राहणारी एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवारपासून बेपत्ता आहे. मेट्रो मॉल भागात फिरायला जाते, असे सांगून ती घरातून निघून गेली होती. शोध घेऊनही न मिळाल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या सर्वांचा खडकपाडा आणि कोळसेवाडी पोलिसांकडून शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news