

डोंबिवली : ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कल्याणमधील महात्मा फुले चौक व डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ५ बांग्लादेशी घोसखोरांना अटक करण्यात आली. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.२४) कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने केली.
कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीत बांग्लादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गांधीनगर झोपडपट्टी परिसरासह कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात धाड टाकून पाच जणांना अटक केली. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. कोणत्याही कागदपत्राशिवाय व भारत सरकारने विहीत केलेल्या मार्गांव्यतिरीक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या या पाचही बांग्लादेशी घुसखोरांवर विनापरवाना भारतात राहत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.