Thane Kalyan Accident News | कल्याणमध्ये भीषण अपघात

दोन रेडी मिक्सरने 9 वाहने चिरडली; 3 जखमी, एक गंभीर
डोंबिवली, ठाणे
दोन सिमेंट रेडी मिक्सरने दिलेल्या जोरदार धडकेत नऊ वाहनांचा चक्काचूर झाला आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे पूना लिंक रोडला शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. सिमेंटचा गिलावा वाहून नेणार्‍या दोन रेडी मिक्सरने नऊ वाहनांना धडक देऊन चिरडले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. तथापी या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक झाली आहे.

कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडला असलेला विजयनगर हा वर्दळीचा परिसर मानला जातो. या रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली. अपघात होत असताना या रस्त्यावर गर्दी कमी होती. अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती, असे या भागातील व्यापार्‍यांसह प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबद्दल दिलेली माहिती अशी, की विजयनगरमधील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभाग कार्यालयासमोरून दोन रेडी मिक्सर वाहने पाठोपाठ उतारावरून चक्कीनाक्याकडे जात होती. उतारावर असताना एका रेडी मिक्सरचा ब्रेक निकामी झाला. मागून चाललेल्या रेडी मिक्सरच्या चालकाला समोरील रेडी मिक्सरचा ब्रेक निकामी झाल्याचे समजताच, चालकाने पुढच्या मिक्सरला रोखण्यासाठी आपला मिक्सर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या गडबडीत ब्रेक निकामी झालेला रेडी मिक्सर समोरच्या टेम्पोवर जाऊन धडकला. त्यामुळे टेम्पो बाजुच्या झाडासह दुकानांच्या समोर धडकला.

टेम्पोला धडक बसल्याने टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पोची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाक्यांसह रिक्षांना बसली. बेसावध टेम्पो चालक झाड आणि दुकानांना धडकल्याने टेम्पोमधील व्यक्ति चालकाच्या केबीनमध्ये चिरडला गेला. त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक रहिवाशांसह पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्याला केबीनमधून बाहेर काढून रुग्णालयाकडे हलविले. तर ब्रेक निकामी झालेल्या रेडी मिक्सरला वाचविण्यासाठी पुढे आलेला रेडी मिक्सर डिव्हायडरवर धडकला. या विचित्र अपघातामुळे विजयनगर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तातडीने हालचाली करून क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून बाजुला केली. रेडी मिक्सरच्या धडकेत चिरडलेली वाहने रस्त्यावरून क्रेनच्या साह्याने बाजुला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. ही वाहने बाजुला घेत असताना पुन्हा या भागात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची कोळसेवाडी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे दोन्ही रेडी मिक्सर वाहन चालक व मालकांच्या चौकशीतून स्पष्ट होणार आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नुकसान झालेल्या वाहनांच्या चालकांनी भरपाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news