

डोंबिवली : हम चॅरिटेबल ट्रस्ट ही डोंबिवलीतील एक संस्था जी गेली सात वर्ष जम्मू-कश्मीरच्या विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी तसेच सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी अविरतपणे काम करते आहे. जोडो जम्मू-कश्मीर या हमच्या सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमांतर्गत कटरा-जम्मूत दिशा छात्रावासातील ३१ विद्यार्थ्यांची डोंबिवलीतील विविध संस्थाना भेट दिली.
जम्मूतील भारतीय शिक्षा समिती संचालित सहा शाळांमधे विज्ञान प्रयोगशाळा तयार करणे, वाचनालय उभारून देणे मसू सारख्या दुर्गम ठिकाणी प्राथमिक शाळा बांधून देणे असे शालेय शिक्षणातील विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे. सांस्कृतिक आदान-प्रदान हा हमचा आणखीन एक प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना जम्मू-कश्मीरमध्ये घेऊन जाणे, आपले प्रकल्प दाखवणे आणि त्यांना आपल्या प्रकल्पांमधे सामील करून घेणे हे काम हम करते आहे.
गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सामील करून घेण्यासाठी जम्मूच्या शाळांमधील, छात्रावासांमधील विद्यार्थ्यांना मुंबईत घेउन येणे, त्याना विविध संस्थांमधे घेउन जाणे, मुंबई-दर्शन इत्यादी विविध उपक्रम हम सांस्कृतिक आदान-प्रदान या उद्देशांतर्गत राबवत असते. या वर्षी कटरा-जम्मू येथील दिशा छात्रावासातील ३१ विद्यार्थी डोंबिवलीतील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. आल्याआल्या विद्यार्थ्यांनी सायन्स अँन्ड आर्ट विथ फन या कार्यक्रमाचा आनंद घेतला. हा कार्यक्रम सौ.जया लुंपाटकी आणि परिवार यांनी प्रायोजित केला.
गुढीपाडव्याच्या पुर्वसंधेला, २९ मार्चला डोंबिवलीतील गणेश मंदिरच्या संभाजी महाराज बलिदान दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. छत्रावासात शिकलेले अभिमन्यूच्या शौर्यगाथेवरील गाण्यावर मनोर्यांचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर केले. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सामील होणे हा त्या विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा अनुभव होता. वेगवेगळे चित्ररथ आणि ढोल-पथके पाहून विद्यार्थी हरखून गेले.
सांस्कृतिक आदान-प्रदान या उपक्रमातील सर्वात महत्वाचा कार्यक्रम होता. प्रत्येक विद्यार्थ्याने डोंबिवलीतील एका कुटुंबाकडे निवासासाठी जाणे. जम्मू-कश्मीरमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सण, चालीरीती समजाव्या तसेच त्याच्याकडून जम्मू-कश्मीर बदल माहीती घ्यावी आणि त्यायोगे या दोन राज्यातील नागरिकांमध्ये प्रेमभाव व आपुलकी निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. डोंबिवलीतील चार शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कुटुंबामधे हे विद्यार्थ्यी रहायला गेले होते. त्यामुळे जम्मूतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील एक समवयस्क मित्र मिळाला. हा दिवस त्या विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहील.
सर्व विद्यार्थी गुरूकुलच्या टर्फवर गेले आणि क्रिकेट व फुटबॉल या खेळांचा भरपूर आनंद लुटला. दुपारी हेरंब म्युझिक स्कूल आणि पै फ्रेंड्स लायब्ररी येथे विवीध कार्यक्रम झाले. हेरंब म्युझिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वाद्यांची ओळख करून घेतली तर पै फ्रेंड्स लायब्ररीत त्यांना पुस्तक बघता आली आणि लायब्ररीतर्फे पुस्तके भेट स्वरुपात पण मिळाली. सायंकाळी जाहीर कार्यक्रमात या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे निमित्त साधून हमने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक आणि ऍडव्होकेट वृंदा कुलकर्णी यांची सदिच्छादूत म्हणून नेमणूक केली. या दोघांचाही काश्मिर या विषयावर अभ्यास आहे. तसेच त्यांची हमला विविध पातळ्यांवर मदत होते. त्यांनी हमचे सदिच्छादूत होण्याचे मान्य केले ही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
एप्रिलच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यी मुंबई-दर्शन साठी गेले. गेटवे ऑफ इंडियाला एक बोट-राईडचा आनंद घेताना त्यांचे डोळे नुसते भिरभिरत होते. उंच उंच इमारती पाहू, भल्यामोठ्या बोटी पाहू की विशाल समुद्र पाहू असे त्यांना होऊन गेले होते. मग नेहरू सायन्स सेंटरला भेट झाली. सायन्स सेंटर म्हणजे तर त्यांच्यासाठी अलिबाबाची गुहाच होती. आ वासून ते विज्ञानातले एक एक चमत्कार पाहत होते. थंडगार थिएटर मधील तीन सायन्स शो त्यांच्या कायम स्मरणात राहातील. शेवटी ज्या कार्यक्रमाची ते आतुरतेने वाट पाहात होते तो कार्यक्रम होता जुहू समुद्रात डुंबणे. त्यांनी समुद्र पहिल्यांदाच पाहिलेला. त्यामुळे त्याच त्यांना फार अप्रूप वाटला. जुहू चौपाटीवरील गर्दीची पर्वा न करता त्यांनी समुद्र स्नानाचा भरपूर आनंद लुटला.
2 एप्रिल हा कटरा-जम्मूतील दिशा छात्रावासातील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आदानप्रदानांतर्गत मुंबई भेटीचा शेवटचा दिवस होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ला असलेल्या कल्याण शहरात या विद्यार्थ्यांचे स्वागत अभिनव विद्यामंदिरच्या मुला-मुलींनी गुलाब पुष्पांच्या पाकळ्या उधळून लेझीमच्या गजरात केले. यावेळी प्रविण देशमुख यांनी शिवरायांच्या कथा सांगुन महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्याच्या महान संस्कृतीची ओळख या विद्यार्थ्यांना करून दिली.
विश्वमंगल संस्थेच्या उत्साही महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर मुलांकडून झुंबा-डान्स करून घेऊन तसेच छोटे छोटे खेळ घेऊन मुलांना प्रोत्साहित केले. पद्मश्री उदय देशपांडे यांनी दोरीचा मल्लखांब, तसेच जमिनीवरील मल्लखांब याची माहीती दिली. त्यांच्या दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर संस्थेच्या खेळाडूंनी दोरीचा, तसेच जमिनीवरील मल्लखांब यावर चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखविली. उदय यांनी जम्मूच्या विद्यार्थ्यांना तेथे जाऊन मल्लखांब शिकविण्याची तयारी दर्शविली.
संकेत लिंगायत यांनी योगा प्रात्यक्षिक मुलांना दाखवताना प्रत्येक योगासनाची माहीती सांगितली. त्यांनी पण जम्मूला जाऊन तेथील मुलांना योगासनं शिकवण्याची तयारी दर्शवली. अपर्णा लेले व परिवार, तसेच कल्याणच्या नमस्कार मंडळाने या कार्यक्रमाचे नियोजन अप्रतिम केले. यासाठी कल्याणमधील इतर संस्था ही सहभागी झाल्या होत्या. कल्याण मधील जम्मू-काश्मीर प्रेमी नागरिकांनी आयोजीत केलेला हा कार्यक्रम पुर्णपणे यशस्वी झाला.
जम्मूहून आलेले सेवाभारतीचे प्रांत संघटन मंत्री परमीतजी यांनी त्यांच्या भाषणात तेथील मुलांसाठी काय काम करता येईल व सेवाभारतीचे उपक्रम सांगितले. तर मनोज नशिराबादकर यांनी हम संस्थेच्या प्रकल्प भेटीत सामील व्हावे व तेथील हमचे प्रकल्प बघावे तसेच छात्रावासातील मुलांबरोबर संवाद साधावा, असे आवाहन केलं आहे.
दुपारी कटराच्या या विद्यार्थ्यांना हमच्या कार्यकर्त्यांनी कल्याण स्टेशनला गाडीत बसवले. तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले होते. गेल्या पाच दिवसांत विद्यार्थ्यांसह कार्यकर्त्यांमधे घट्ट ऋणानुबंध तयार झाला होता. हमच्या सांस्कृतिक आदान-प्रदान या प्रकल्पाची सांगता तुकाराम महाराजांच्या शब्दात करायची झाली तर असेच म्हणावे लागेल...याज साठी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||