

कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातील जागे बाबत महायुती मधील वादाच्या ठिणगीत आता महाविकास आघाडीतील काँग्रेस ने उडी घेत कल्याण पूर्वेच्या जागेवर आपला दावा ठोकित शिवसेना ठाकरे गटाला लक्ष केले आहे. ठाकरे गटाकडे उमेदवार नसल्याने त्यांना उमेदवार आयात करण्याची वेळ आली असल्याने कल्याण पूर्व विधान सभा मतदार संघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने हा मतदार संघ आपल्याला मिळावा अशी मागणी कॉंग्रेसचे नवीन सिंग यांनी केला आहे.
कल्याण पूर्व मतदार संघात जागा वाटपावरून संघर्ष सुरु झाला असून हा वाद महाविकास आघाडी पर्यत सरकला आहे. महाविकास आघाडीतून ठाकरे गटाच्या तिघांनी या मतदार संघावर दावा केलेला असतानाच आता या मतदार संघात असलेल्या ३ लाख ८२ हजार मतदारापैकी जवळपास ४२ टक्के मतदार उत्तर भारतीय असल्याने या मतदार संघातून आपल्याला तिकीट मिळावी अशी मागणी नवीन सिंग यांनी केली आहे.
या माध्यमातून कॉंग्रेसने ठाकरे गटावर दबाव वाढवण्याच प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेसकडून कल्याण पूर्व मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवार असल्याचा दावा करताना सिंग यांनी ठाकरे गट सर्वच मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे मात्र त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाहीत. कल्याण पूर्व मतदार संघात जे होते ते शिवसेना शिंदे गटात गेले आहेत त्यामुळे ठाकरे गटावर उमेदवार आयात करण्याची वेळ आलीये असा टोला लगावला. त्याच बरोबर वरिष्ठ पातळीवर काही घडामोडी घडल्या व एकटे लढण्याची वेळ आली तरीही कल्याण पूर्वेची जागा काँग्रेस निश्चितपणे लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे कल्याण पूर्व मतदारसंघातील राजकारणात चांगलीच चुरस निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.