

ठाणे : ठाण्यातील मानपाडा येथे रुणवाल बिल्डर्सच्या निर्माणाधीन इमारतीतून लोखंडी रॉड खालील बैठ्या चाळीच्या पत्र्याचे छत फोडून थेट स्वयंपाकघरात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने त्यावेळी स्वयंपाकघरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मात्र, गेल्या सहा महिन्यांत अशा प्रकारची ही चौथी घटना असल्याने परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चितळसर-मानपाडा नाक्याजवळ पेट्रोल पंपाशेजारी रुणवाल बिल्डर्सचा मोठा प्रकल्प सुरू असून, येथे सुमारे ५० मजली इमारतींचे बांधकाम सुरू आहे. याच निर्माणाधीन इमारतीतून लोखंडी रॉड खालील बैठ्या घराच्या स्वयंपाकघरात कोसळला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “एकदा अशी घटना घडली तर मानवी चूक म्हणून समजून घेता येईल; मात्र, गेल्या सहा महिन्यांत चौथ्यांदा असा प्रकार घडत असेल तर बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचे स्पष्ट होते,असा आरोप त्यांनी केला.“दरवेळी अशा घटनांनंतर एखाद्या कंत्राटदारावर किंवा त्याच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो. मात्र, यावेळी थेट रुणवाल बिल्डरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच, संबंधित बांधकामाचे काम तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी प्रधान यांनी केली.