

उरण : मुंबईच्या वाहतूक सुविधेत आमूलाग्र क्रांती घडवणार्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूवर जीवनयात्रा थांबविण्याच्या घटना वाढत असल्यानेच एमएमआरडीएने आयआयटीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अपघात व जीवनयात्रा थांबविण्याच्या घटनांना रोखण्यासाठी लवकरच तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पर्यावरणाचा विचार करून 13 जानेवारी रोजी अटल सेतूचे सर्वसामान्यांच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात आले. मात्र, मागील 8 महिन्यांत या सेतूवर 6 जीवनयात्रा थांबविण्याच्या घटनांनाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या घटनांची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, मार्गावर सुरक्षेसाठी नॉईज बॅरिकेड्स, व्ह्यू बॅरिकेडस लावण्यात आली आहेत. पर्यावरणाचा विचार करून ही पावले उचलण्यात आली आहेत. जीवनयात्रा थांबविण्याच्या घटना वाढल्याबाबत विचारले असता, काही भाग अटल सेतू आणि आजूबाजूचापरिसर न्याहळण्यासाठी पर्यटकांना ठेवण्यात आल्याचे एमएमआरडीएने सांगितले. तर, तत्काळ आयआयटी समिती गठीत करत याबाबत उपाययोजना आणि आवश्यक बाबी तपासल्या जाणार असल्याचे देखील एमएमआरडीएने सांगितले.
या मार्गावर बॅरिकेड्स असले तरी तणावात असताना काही व्यक्तींकडून अखेरचे प्रयत्न करत असताना सर्व सीमा ओलांडल्या जातात. बॅरिकेड्सवर चढून देखील जीवनयात्रा थांबविण्याचे प्रयत्न करण्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या पुलाखाली सेफ्टी नेट लावल्यास संबंधित व्यक्ती या जाळ्यात अडकून पुढील मदत मिळेपर्यंत सुरक्षित राहू शकतो, असे न्हावा शेवा पोलीस स्थानकाकडून सांगण्यात आले. हा सेतू सुरू झाल्यापासून आतापर्यंत 6 जीवनयात्रा थांबविण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये न्हावाशेवा पोलीस स्थानकाने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या एका नागरिकाला वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या घटना दुर्दैवी असून या मार्गावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर हा मृत्यूचा हॉटस्पॉट ठरू शकतो.
आम्ही या मार्गावर सतत पेट्रोलिंगच्या माध्यमातून गस्त ठेवत असतो. सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण कक्षाकडून नियंत्रण ठेवण्यात येतः आहे. एखादी घटना घडली तर अवघ्या काही वेळात बचाव पथक घटनास्थळी पोहोचते. मात्र, भलामोठा रस्ता असल्याने अनेकदा संबंधित व्यक्ती अचानकपणे गाडी थांबवून अवघ्या काही सेकंदांत आत्महत्या करते, त्यावेळी आमच्यासाठी आव्हानात्मक ठरते. सेफ्टी नेट एमएमआरडीएद्वारे उभारल्यास संबंधित व्यक्तीचा बचाव करण्यास अधिक वेळ मिळेल.
अंजुम बागवान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावाशेवा पोलीस ठाणे