

किन्हवली : संतोष दवणे
समस्यांशी दोन हात करून यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ऐन तारुण्यात अनमोल मानवी जीवन संपवण्याकडे अलिकडच्या तरुणाईचा कल वाढताना दिसत आहे. शहापूर तालुक्यात ग्रामीण भागात मागील एका महिन्यात 15 तरुणांनी मानसिक ताणतणावाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची बाब समोर येत आहे.
शहापूरच्या ग्रामीण भागात सध्या सुरू असलेले आत्महत्यांचे सत्र पाहता या तरुणाईला झालेय तरी काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. मागील महिन्याभरात शहापूरच्या ग्रामीण भागात प्रेमभंग, वाढलेल्या कर्जाचा बोजा, पालकांच्या अपेक्षा पूर्ण न करु शकल्याने आलेले नैराश्य, बेकारी, अभ्यासाचा असह्य ताण, धंद्यात आलेले अपयश, दीर्घकालीन आजार अशा अनेक कारणांमुळे 15 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. किन्हवलीत ऐन पंचविशीतील दोन तरुणांनी गळफास घेत जीवनप्रवास थांबविला.
शेंद्रूण परिसरात दोन लहान मुलं असलेल्या तरुण दांपत्याने जीवन संपवले. अल्याणी परिसरातील तरुणाने तणनाशक प्राशन करत मृत्यूला कवटाळले. ऐन तारुण्यात निधड्या छातीने प्रतिकूल परिस्थितीला सामोर जाणे अपेक्षित असताना हतबल होवून जीवनालाच पूर्णविराम देण्याची घातक मानसिकता तरुण वर्गात मूळ धरत असल्याचे दृष्टीस पडत आहे.
प्रेरणादायी पुस्तकांचे कमी झालेले वाचन, कुटुंबियांबद्दल वाटणारा अविश्वास, कौटुंबिक जबाबदारीचे नसलेले भान, मोबाईल- इंटरनेटवरील आभासी जगाचा अतिप्रभाव या सर्व गोष्टी तरुणांचे मानसिक खच्चीकरण करण्यास कारणीभूत ठरत असून त्यातूनच एकापाठोपाठ एक आत्महत्येच्या घटना घडत असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. शालेय जीवनातच मानसिक ताणतणावाला सामोरे जाण्याचे व अतिमहत्वाकांक्षेला बळी न पडण्याचे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत किन्हवलीतील शिक्षणतज्ज्ञ व्यक्तीमत्व विठ्ठल गगे गुरुजी यांनी व्यक्त केले आहे.
कोणतीही आत्महत्या हा भावनांच्या उद्रेकाचा जीवघेणा क्षणिक कल्लोळ असला तरी या टप्प्यापर्यंत पोहचण्याची एक दीर्घ प्रक्रिया असते. आज आत्महत्त्या करणारे युवक हे 2000 च्या आसपास जन्माला आलेल्या जनरेशन झेडचे प्रतिनिधी आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मल्याने स्वातंत्र्यलढा, त्याग, बलिदान, देशप्रेम व विचारसरणी याबद्दलची त्यांची जडणघडण वेगळ्या कालखंडात झालेली आहे. त्यांचे वाचन, दृष्टिकोन, वैचारिक बैठक, सहनशक्तीची मर्यादा, संस्कार, मूल्य, देशप्रेमाच्या संकल्पना, पैशांबद्दलचे विचार, करिअरबद्दलच्या कल्पना मागच्या पिढीपेक्षा वेगळ्या आहेत. मोबाईल व संगणक यांचा वापर, 5 जी, 7 जी, इंटरनेट, समाजमाध्यमांचा विळखा, व्हॉट्स अॅप विद्यापीठाचे आक्रमण व यातून निर्माण झालेली उथळ विचारशैली हा एक महत्त्वाचा घटक आहे.
बदललेल्या जीवनशैलीत पालकांचा मुलांशी तुटलेला संवाद, तरुण पिढीला आलेले एकाकीपण, औदासीन्य व नैराश्य, विद्यार्थ्यांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, परीक्षेतील जीवघेण्या स्पर्धा, शिक्षण संपल्यानंतर त्याच्या कुचकामीपणाची झालेली जाणीव व त्याची बेरोजगारीत झालेली परिणीती संपवतेय जीवन.
वाढते वय, सुमार वेतन व भरमसाठ अपेक्षा यांचा व्यत्यास, ज्ञान आणि कौशल्याचा एकीकडे अभाव तर दुसरीकडे नोकरीतील न झेपणारी उद्दिष्टे व ती साधता न आल्याने क्षणाक्षणाला वाढत जाणारे ताणतणाव यांमुळे आजची तरुणपिढी हैराण आहे. समोर उभ्या आव्हानांचा धीटपणे सामना करण्याऐवजी मृत्यूला कवटाळणे त्यांना अधिक सुसह्य वाटते, हे आपल्या देशाला परवडणारे नाही.
सध्याच्या पीढितील तरूणांना धर्म संस्कार देणे गरजेचे आहे. रामायण, महाभारत यातील काही कथा आणि त्यातून मिळालेले बळ, आचरण, मानसिक आरोग्य पोषक करते. त्याचे पठण किंवा चिंतन होणे गरजेचे आहे. सत्संग, भागवतीक मार्गातून नक्कीच मानसिक बळ वाढू शकते, हे देखिल सत्य आहे.