डोंबिवली : बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आली आहे. मद्यपान करून आलेल्या सावत्र पित्याने त्याच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी (दि.18) रात्रीच्या सुमारास घडला.
पश्चिम डोंबिवली परिसरातील तक्रारदार मुलीच्या पित्याला दारूचे व्यसन जडले असून नेहमीप्रमाणे तो गुरुवारी सायंकाळी दारू ढोसून घरी आला. सायंकाळी सात ते पहाटे तीन वाजेपर्यंत घरात धिंगाणा करत त्याने मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलीने त्याला विरोध केला. मात्र त्यामुळे संतापलेल्या पित्याने मुलीला मारहाण केली. हा प्रकार कुणाला सांगितला तर समाजात आपली बदनामी होईल, अशी भीती पीडितेला सतावत होती. तरीही तिने हिंमत करून पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलीला पोलिसांनी धीर देऊन तिची जबानी घेतली. या जबानीनुसार पोलिसांनी तत्काळ सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सावत्र पित्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.