

ठाणे : ठाणे तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी 108 बिल्डर, कंत्राटदार, मालक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे तहसीलदार उमेश पाटील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासंबंधीचा अहवाल 9 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ठाण्यातील अनधिकृत गौण खजिनाचा घोटाळा उघड झाला आहे. ठाणे तालुक्यातील अनेक ठिकाणी नवीन इमारतींचे कामे सुरू आहेत.
त्यासाठी गौण खनिजासाठी अधिकृत परवानगी घ्यावी लागते. मात्र कर भरायला होईल म्हणून अनधिकृत गौण खनिज उत्खनन, वाहतूक केले जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ठाणे तहसीलदार पाटील यांनी सबंधित अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या 108 कंत्राटदार,मालक तसेच कब्जेदार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार आहेत अशी माहीती दिली. ही गौण खनिज चोरी ही ठाणे, बाळकुम, बेलापूर, मुंब्रा, दहिसर अशा गावांमधील आहेत.
कसूरदारांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची कार्यवाही
वारंवार जमीन मालकांना सूचना देऊन देखील जमीन मालक हे त्यांनी अधिकृतपणे केलेले जे उत्खनन आहे, त्या उत्खलनाच्या अनुषंगाने शासनाची दंडनीय रक्कम भरत नाहीत. टाळाटाळ करीत आहेत. वारंवार त्यांना संधी देऊन देखील त्यांनी शासनाची दंडणीय रक्कम भरलेली नाही, किंवा सक्षम न्यायालयाचा आदेश देखील आणलेला नाही. आता सदर कसूरदारांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची कार्यवाही देखील चालू करण्यात आलेली आहे, तसेच संबंधितांवरती फौजदारी गुन्हा दाखल दाखल करण्यात येत आहे. फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई आजच चालू होईल, असे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले आहे.