ठाणे : कल्याणच्या गौरीपाड्यासह गोदरेज हिल भागात बेकायदा बांधकाम प्रकरण

दोन वेगवेगळ्या प्रकरणांत पाच जणांवर गुन्हे दाखल; खडकपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
कल्याण डोंबिवली महानगरपालिकाpudhari file photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा आणि गोदरेज हिल भागातील बेकायदा बांधकाम प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. या भागात दोन वेगवेगळ्या बेकायदा बांधकामांमधील एकूण पाच जणांंच्या विरोधात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ब प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये (एमआरटीपी) फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.

केडीएमसीच्या ब प्रभागातील अधीक्षक भूषण कोकणे यांनी सदर फिर्याद खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. गोदरेज हिल परिसरात पटेल आर मार्ट जवळ मोकळ्या जागेत जयराम गणेशा पटेल यांनी एका पत्र्याच्या निवाऱ्याचे बेकायदा बांधकाम केले असल्याची तक्रार कल्याणमधील माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केडीएमसीत दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केडीएमसीने जयराम पटेल यांना बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार जयराम पटेल हे सुनावणीला हजर राहिले. जमीन मालकी हक्काची कागदपत्रे त्यांनी सादर केली. परंतु, बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी, तसेच महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या बांधकाम परवानगीची कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे पटेल यांचे बांधकाम अनधिकृत घोषित करून ते स्वत:हून तोडून टाकण्याचे बजावण्यात आले. पटेल यांनी निवाऱ्याचे बांधकाम स्वत:हून तोडून घेतले नाही. अखेर ब प्रभागाच्या बेकायदा बांधकाम विरोधी पथकाने कारवाई करून सदर बांधकाम तोडून टाकले. त्यानंतरही तोडलेले बांधकाम पटेल यांनी तीन वेळा पुन्हा उभारल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. एकच चूक पटेल सतत करत असल्याने त्यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

दुसऱ्या एका प्रकरणात मौजे गौरीपाडा परिसरातील योगीधाम भागात एकनाथ भोईर-मानेरकर, गोपीनाथ भोईर, प्रल्हाद भोईर आणि अशोक भोईर यांनी बेकायदा चाळींचे बांधकाम केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते इंद्रमणी उपाध्याय यांनी केडीएमसीच्या ब प्रभागात केली होती. ब प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीवरून बांधकामधारकांना बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी कागदपत्रे दाखल करण्याची नोटीस बजावली. बांधकामधारकांनी जमिनीची कागदपत्रे सादर केली. तथापी बांधलेल्या चाळीच्या बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी, तसेच महापालिकेच्या बांधकाम परवानगीची कागदपत्रे ते सादर करू शकले नाही. त्यामुळे त्यांचे बांधकाम अनधिकृत घोषित करून ते स्वत:हून तोडून टाकण्याची नोटीस बांधकामधारकांना बजावण्यात आली.

तरीही बांधकामधारकांनी ते बांधकाम स्वत:हून काढून टाकले नाही. याऊलट केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना त्या चाळींमध्ये रहिवासी राहत असल्याचे आढळून आले. सदर चाळ रहिवास मुक्त करण्याची नोटीस बांधकामधारकांना बजावण्यात आली आहे. बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड, आणि सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या निर्देशांवरून अधीक्षक भूषण कोकणे यांनी बांधकामधारकांविरुध्द एमआरटीपी कायद्यान्वये दाखल केलेल्या फिर्यादीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

बेकायदा बांधकामांना खतपाणी घालणारे मोकाट

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. स्वस्त दरात परवडेल अशी घरे देतो असे सांगून सर्वसामान्य आणि गोरगरिबांना लुटणाऱ्या कथित बांधकाम व्यवसायिकांनी केडीएमसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बैठ्या चाळी आणि बहुमजली इमारती उभारण्याचा सपाटा लावला होता. आता हा डाव कथित बांधकाम व्यवसायिकांसह त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगलट आला आहे. अद्याप हे अधिकारी मोकाट आहेत. आत्तापर्यंत संदीप रोकडे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली दिसून येत नाही. मात्र यापूर्वी झालेल्या बेकायदा बांधकामांना भुईसपाट करून अशी बांधकामे करणाऱ्यांच्या विरूध्द एमआरटीपी अंतर्गत फौजदारी कारवाया करण्याचे फर्मान आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांनी सोडल्याने प्रभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी अशाप्रकारचे गुन्हे दाखल करण्याच्या मोहिमेला वेग दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news