ठाणे : डहाणूतील आदिवासी कलाकारांचे राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश
डहाणू : डहाणू तालुक्यातील निकणे-घाटाळपाडा गावच्या जननायक बिरसा मुंडा मंडळाने राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी करत आदिवासी संस्कृतीचा झेंडा उंचावला आहे. छत्तीसगड राज्यातील रायपूर सायन्स कॉलेज मैदानावर 14 व 15 नोव्हेंबर रोजी आयोजित आंतरराज्यीय जनजातीय गौरव दिवस नृत्य महोत्सवात त्यांनी तारपा नृत्याचे प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.
या महोत्सवात देशभरातील आदिवासी कलाकारांनी आपापल्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन केले. डहाणूतील जननायक बिरसा मुंडा मंडळाने पारंपरिक तारपा नृत्यासह टिपरी नाच, गौरी नाच आणि धुमश्या नाच सादर करून प्रेक्षकांसह परीक्षकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणातून आदिवासी जीवनशैली, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रभावी दर्शन घडले. बिरसा मुंडा मंडळ हे आदिवासी कला व परंपरेच्या संवर्धनासाठी सतत कार्यरत आहे. जिल्हा व राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्येही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नृत्य सादरीकरणातून आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटतो.

