

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून अनेक ठिकाणी झाडे पडणे, इमारतींचे भाग कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि विजेच्या धक्क्याच्या घटना घडल्या आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. भिवंडीत दोन जणांवर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३२.८८ मिमी पावसाची नोंद झाली असून शहापूर (१६९ मिमी), मिरा-भाईंदर (१६८ मिमी), अंबरनाथ (१६० मिमी) आणि मुरबाड (१५८ मिमी) येथे अतिमुसळधार पाऊस झाला. ठाणे तालुक्यात ११४ मिमी, भिवंडीत १२२ मिमी आणि कल्याणमध्ये ७७ मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या आठवड्यापासून कोकणासह ठाणे जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने ६ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता, तर ७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. या कालावधीत अनेक भागांमध्ये संततधार पाऊस सुरू राहिल्याने नद्या, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली.
शहरांसह उपनगरांतील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने आणि फांद्या तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. मिरा-भाईंदर येथे एस. व्ही. रोडवरील रजिस्ट्रार कार्यालयाजवळ दुचाकीवरून जात असताना अशोक पाटील (वय ५५) यांच्यावर नारळाचे झाड कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर सोमवारी अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली धरणात विसर्जनासाठी गेलेले विकास कांबळे (वय २९, रा. उल्हासनगर) यांचा बुडून मृत्यू झाला.
सावरोली पूल पाण्याखाली; वासिंद–वाडा-मनोर मार्गावरील वाहतूक ठप्प
वासिंद : सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर आल्याने वासिंद–कांबारे मार्गावरील सावरोली पूल मंगळवारी दुपारी पाण्याखाली गेला. त्यामुळे वासिंद–वाडा, मनोर व गुजरातकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील व बंडू किसले यांनी पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आल्याचे सांगितले. काही वाहनचालकांना कांबारे–अघई मार्गे पर्यायी वळसा घ्यावा लागला.
नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
शहापूर तालुक्यात पुराच्या पार्श्वभूमीवर ३० कुटुंबांतील ११८ नागरिकांचे उंबरमाळी येथील सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अंबरनाथ तालुक्यात दरडप्रवण क्षेत्रातील ६० कुटुंबांतील २४१ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांनाही आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
ठाणे शहरात इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळण्याच्या घटनेनंतर १७ कुटुंबांतील ६६ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून, हे सर्व ६६ नागरिक अद्याप स्थलांतरित आहेत. त्यांनाही प्रशासनाकडून अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
खडवलीत भातसा नदी धोक्याच्या पातळीपार
टिटवाळा : मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील खडवली येथे भातसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणी वाढत राहिल्यास खडवली–पडघा मार्गावरील पूल पाण्याखाली जाऊन दोन्ही भागांतील संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे.नदीकाठावरील अनेक इमारती, दुकाने आणि काही घरांमध्ये पाणी शिरले असून प्राचीन शिवमंदिराच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. केवळ मंदिराचा कळस दिसत आहे.प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक असल्यास सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.