ठाणे : कारगिल युद्धाचा थरार ऐकून डोंबिवलीकर योद्ध्यापुढे नतमस्तक

लेफ्टनंट कर्नल श्रीराम गाडगीळांनी उलगडली शौर्य गाथा
ठाणे : कारगिल युद्धाचा थरार ऐकून डोंबिवलीकर योद्ध्यापुढे नतमस्तक
Published on
Updated on

डोंबिवली (ठाणे) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात अनेक शूर सैनिक आपले प्राण पणाला लावून आपल्या देशाकरिता लढले. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रातील मूळचे पनवेल येथील लेफ्टनंट कर्नल श्रीराम गाडगीळ यांचाही या युद्धात सहभाग होता.

Summary

डोंबिवलीतील रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.28) रोजी गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात लेफ्टनंट कर्नल श्रीराम गाडगीळ यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नल गाडगीळ यांनी कारगिल युद्धातील त्यांच्या कामगिरीचे अत्यंत रोमांचक अनुभव सांगितले. प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या कर्नल श्रीराम गाडगीळ यांनी सादर केलेल्या कारगिल युद्धाचा थरार ऐकून डोंबिवलीकर या योद्ध्यापुढे नतमस्तक झाले होते.

लष्करात जाण्याच्या प्रेरणेबद्दल सांगताना कर्नल गाडगीळ यांनी पनवेल जवळच्या रसायनीतील शाळेत शिक्षण घेत असताना शिक्षकांकडूनच प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. पुढे लष्करात दाखल होण्यासाठी असलेल्या परीक्षा आणि प्रक्रिया यामध्ये मोठ्या शहरांपासून दूर रहात असल्यामुळे त्याकाळी येणाऱ्या अडचणी देखील त्यांनी सांगितल्या. या सगळ्यावर मात करून कर्नल गाडगीळ यांची कारगिल युद्धाच्या केवळ एक वर्ष अगोदर नेमणूक करण्यात आली होती. जेव्हा युद्ध सुरू होणार होते तेव्हा कर्नल गाडगीळ हे सुट्टीवर होते. त्यांना तातडीने बोलावून घेण्यात आले. युद्ध सुरू असताना लष्करातील कुणालाही घरी बसवत नसल्याचे कर्नल गाडगीळ यांनी सांगितले.

कारगिल युद्धाच्या काळात केलेल्या कामगिरीचे विश्लेषण करताना कर्नल गाडगीळ यांनी त्याला तीन टप्प्यात विभागून सांगितले. पहिल्या टप्प्यात लेह-कारगिल हायवे उध्वस्त करणे हे शत्रूचे ध्येय असल्याने त्या हायवेचे संरक्षण करणे आणि शत्रूला तिथे घुसू न देणे ही जबाबदारी कर्नल गाडगीळ आणि त्यांच्या सहकऱ्यांकडे सोपवण्यात आली. याच्या यशस्वी पूर्तते नंतर दुसऱ्या टप्प्यात त्याच हायवेपासून पुढे मुश्कोह नाल्यावर असलेल्या जॅक रीफ नावाच्या पुलाचे शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली. हा पूल भारतीय सैन्याची वाहतूक आणि संपर्क ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. या दोन्ही टप्प्यातील कामगिरीच्या यशस्वी पूर्ततेनंतर कर्नल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सीमेलगत असणाऱ्या एका उंच टेकडीवर जाऊन पोस्ट उभारण्याची जबाबदारी देण्यात आली. सुमारे १६ ते १७ हजार फूट उंचीवर असलेली ही टेकडी एखाद्या सुळक्याप्रमाणे आहे. तीव्र चढ असलेली आणि अतिशय कमी सखल भाग असून सीमेलगत असल्याने या टेकडीवरून मोठ्या सीमाप्रदेशावर लक्ष ठेवणे शक्य होणार होते. त्यामुळेच या टेकडीवर शत्रूचे सैन्य पोहचायच्या आत आपण पोहचून ती सुरक्षित करणे आवश्यक होते. कर्नल गाडगीळ आणि त्यांच्या सोबत १३ जवानांची तुकडी यांनी ही टेकडी चढण्यास सुरूवात केली. पाऊस, बर्फ, वादळी वारे, ढग, अत्यंत कमी दृश्यमानता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत ही चढाई सुरू होती. वाटेत विखुरलेल्या पद्धतीने जागोजागी असलेल्या असंख्य भूसुरुंगांना चकवत कोणतीही मनुष्यहानी अथवा दुखापत न होता ही चढाई सुरू होती. या संकटांसोबतच शत्रूकडून सतत होत असलेला गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यापासून देखील स्वतःचा बचाव सुरू होता. एखादी तोफ त्या सुळक्यावर डागली गेली की होणारा दगडांचा वर्षाव, भूस्खलन याने ही चढाई आणखीनच कठीण होत होती.

कामगिरीच्या गौरवार्थ 'गाडगीळ पॉईंट'

कर्नल श्रीराम गाडगीळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावून, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि देशप्रेमाच्या जोरावर ही मोहीम यशस्वी करून मुश्कोह टेकडीवर भारताचा तिरंगा फडकला. अशा अतिशय कठीण आणि मोक्याच्या जागेवर शत्रूच्या आधी आणि मोजक्याच सैन्याच्या साह्याने केलेल्या कर्नल गाडगीळ यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून या ठिकाणास RCGadgil किंवा गाडगीळ पॉईंट असे नाव भारतीय लष्कराकडून देण्यात आले.

35 फुटांवरून आदळूनही पंजाबची मोहीम फत्ते

कर्नल गाडगीळ यांच्याकडून हा थरार ऐकताना उपस्थित श्रोत्यांना रोमांच अनुभवता आला. कारगिल येथील कामगिरीनंतर कर्नल गाडगीळ यांना संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर पंजाब सीमेवर शत्रूच्या कारवायांना आणि अतिक्रमणांना रोखण्यासाठी तैनात करण्यात आले होते. तेथेही त्यांनी लष्करी शिस्त आणि प्रणाली यांच्या उत्तम अमलबजावणीने भारतीय भूभागात पाकिस्तानी सैन्याकडून लावण्यात आलेल्या असंख्य भूसुरुंगांना निकामी करण्याची कामगिरी यशस्वी केली. दरम्यान बेळगाव येथे सैनिकांना देण्यात येणाऱ्या कमांडो प्रशिक्षणादरम्यान सुमारे ३५ फूट उंचीवरून जमिनीवर आदळल्याने कर्नल गाडगीळ यांना मणक्याची दुखापत झाली. अर्थात या दुखापतीचा त्रास पंजाब येथील कामगिरी पूर्ण केल्यानंतर काही वर्षांनी उद्भवला. त्यामुळे पंजाब येथील मोहिमेत देखील आपण सहभागी होऊ शकल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकला मोठा हादरा

ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना भारताने पाकिस्तानी आणि आतंकवादी कारवायांचे चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान आणि आतंकवादी संघटना यांना या हल्ल्यामुळे मोठा हादरा बसला असून प्रचंड नुकसान देखील झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजच्या काळात कोणतेच शहर हे युद्धभूमीपासून दूर राहिले नसून युद्धकाळात सर्वच नागरिकांनी सतर्क राहून सरकारकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन केले पाहिजे असे सांगितले.

निवृत्त फौजींच्या ज्ञानाचा फायदा आवश्यक

सध्या पुण्यात स्थायिक असलेल्या कर्नल गाडगीळ यांनी कॉर्पोरेट जगतात पुढील काळ व्यतीत करण्याचे ठरविल्याचे सांगितले. सैन्यातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या आणि जवानांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग होण्याच्या दृष्टीने विविध कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्यांनी सुचविले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीचे सचिव आशिष देशपांडे यांनी कर्नल गाडगीळ यांची मुलाखत घेतली, मयुरेश गद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्या कु. केतकी देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news