

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने टिटवाळ्यातील 1/अ आणि डोंबिवलीतील 7/ह प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवून निष्कासनाची कारवाई केली. केडीएमसीच्याच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांशानुसार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया करण्यात आल्या. केडीएमसीच्या आक्रमक पावित्र्यामुळे बदमाशांसह कथित बांधकाम व्यावसायिकांची पळता भुई थोडी झाली आहे.
1/अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदिप रोकडे यांनी कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर असलेल्या टिटवाळ्यातील गणेशवाडीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बैठ्या चाळीतील 4 खोल्या भुईसपाट केल्या. ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांच्या साह्याने सहाय्याने करण्यात आली. टिटवाळा परिसरामध्ये बैठ्या चाळी उभारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा बेकायदा चाळीतील घरे विकून बदमाश मंडळी नंतर पसार होतात. त्यामुळे अशा बेकायदा उभारण्यात आलेल्या घरांवर केडीएमसीमार्फत पाडकामाची कारवाई करण्यात येते. गोरगरिबांची फसवणूक होऊ नये, यासाठी शासन/प्रशासनाच्या संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन चौकशी केल्याखेरीज घरे खरेदी करू नयेत, असे आवाहन या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.
तर दुसरीकडे पश्चिम डोंबिवलीतील कोपर गावात असलेल्या चारूबामा शाळेजवळील तळ + 2 मजली अनधिकृत इमारतीवर 7/ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी निष्कासनाची कारवाई केली. ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचारी, महापालिकेला देण्यात आलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात 1 पोकलेनच्या साह्याने करण्यात आली.