

ठाणे : नवी मुंबई महापालिकेचे ’पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय’ सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग मार्फत परवानगी प्राप्त झालेली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची 1 जुलै 2024 रोजी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला यश आले असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात मंजुरी:
मेडिसिन -3 सीट्स
ऑर्थोपेंडीक - 2 सीट्स
गायनॅकोलॉजी - 8 सीट्स
पिडीयाट्रीक - 4 सीट्स
एकूण 17 सीट्स
मेडीकल सायन्स इन्स्टिटयुट सुरु करण्यासाठी महानगरपालिकेच्या वाशी व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात लवकरच महाविद्यालय सुरू केले जाणार आहे
या पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होईल
याव्दारे महापालिका रुग्णालयात मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडीयाट्रीक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी अॅण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार असून नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत, असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
महापालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांचेही आवश्यक परवानगी प्राप्त व्हावी यादृष्टीने सहकार्य लाभले.
नरेश म्हस्के, खासदार