ठाणे : गोएंका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सहलीदरम्यान विनयभंग; पालकांचे शाळेसमोर आंदोलन, तीन शिक्षकांसह कर्मचारी निलंबित

ठाणे : गोएंका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सहलीदरम्यान विनयभंग; पालकांचे शाळेसमोर आंदोलन, तीन शिक्षकांसह कर्मचारी निलंबित
Published on
Updated on

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : सी. पी. गोएंका शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थींसोबत विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पालकांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २१) तक्रार दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पालकांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (दि. २२) सकाळी शाळेच्या बाहेर सुमारे नऊ तास ठिय्या दिला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नसल्याची भूमिका यावेळी पालकांनी घेतली. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत सहा लोकांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये तीन शिक्षकांचा समावेश आहे. शाळा व्यवस्थापन बदलण्याची मागणी यावेळी पालकांनी केली असून व्यवस्थापन आणि पालकांच्या शिष्टमंडळाची एक बैठक देखील यावेळी झाली.

कापुरबावडी भागात 'सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूल' या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची मंगळवारी घाटकोपर येथील एका थीम पार्कमध्ये सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ हजार ६०० रुपये घेण्यात आले होते. एका खासगी कंपनीच्या बसगाड्यांमधून विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेले जात होते. मंगळवारी एकूण चार बसगाड्या या सहलीसाठी निघाल्या. या बसगाडीपैकी एका बसगाडीत जावेद खान हा सेवक (अटेन्डन्ट) म्हणून होता. बसगाडीमध्ये खाद्य पदार्थाची पाकिटे वाटत असताना, जावेद याने काही मुला-मुलींचा विनयभंग केला. बसगाडीमधून उतरल्यानंतर एका मुलीने तिच्या पालकांना याप्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर आणखी सात ते आठ मुला-मुलींसोबत असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा पालकांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी जावेद खान याला अटक केली होती. तर बसगाड्यांमधील तीन शिक्षकांना निलंबित केले होते.तर गुरुवारी पालकांनी शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केल्यानंतर आणखी तीन जणांना निलंबित करण्यात आले असून असे एकूण सहा लोकांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. नावाजलेल्या शाळेत असे हलगर्जीपणाचे प्रकार घडत असतील तर कोणावर विश्वास ठेवायाचा असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. जो पर्यंत शाळा व्यवस्थापक कारवाई नाही करत तो पर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णयही पालकांनी घेतला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहिती शाळा प्रशासनाने यावेळी दिली.

राजकीय नेत्यांनी घेतली पालकांची भेट..

या गंभीर प्रकरणानंतर भाजपचे आमदार संजय केळकर, भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, यांनी गुरुवारी पालकांची भेटी घेऊन मॅनेजमेंटची देखील भेट घेतली. यावेळी कारवाई करण्यासंदर्भातील निवेदनही त्यांनी दिले. तर बुधवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी देखील पालकांची भेट घेऊन परिस्थिती समजून घेतली. यावेळी आम्हाला या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नको अशी मागणीही यावेळी काही पालकांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news