

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेत कर्मचाऱ्यांची वेगाने निवृत्ती होत असत आहे. कर्मचारी संख्या कमी होत असल्याने प्रशासनाची ओढाताण होत आहे. नव्या आकृती बंधानुसार राज्य शासनाकडून २०२१ मध्ये ७५७ कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली होती.
मागील चार वर्षांच्या काळात पालिकेतील ३०० हून अधिक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामुळेच प्रशासना कडून १,०७६ जागांसाठी महानोकरभरतीचे नियोजन करण्यात आले आहे. या नोकरभरतीत प्रकल्प ग्रस्त कल्याण डोंबिवली मधील भूमिपुत्रांना स्थान देण्यात याव अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शासकीय प्रकल्प झाले आहेत. या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी घेऊन केडीएमसीने त्यांना भूमिहीन केलं. आता केडीएमसी कडून नोकर भरती केली जात आहे. या नोकर भरतीमध्ये पाहिलं प्राधान्य भूमीपुत्रांना देण्याची मागणी करण्यात आली आहे. १९९५ नंतर होणारी ही पहिलीच मेगाभरती असून, टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबाबत नुकतीच पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आढावा बैठक घेतली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेत १९९५ मध्ये शेवटची नोकरभरती करण्यात आली होती. यानंतर पालिकेत काही जागांवर अनुकंपा तत्त्वावर कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. तर आकृती बंध मंजूर झाल्यानंतर पालिकेत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत काही रिक्त जागा भरण्यात आल्या. मात्र, तरीही महापालिकेत कर्मचाऱ्यांची वानवा आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांपासून आरोग्य विभागातील डॉक्टर आणि तृतीय, चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपासून ते लिपिकापर्यंतच्या निम्म्याहून जागा रिक्त असल्याने प्रशासनाचा गाडा हाकताना दमछाक होत आहे. यामुळेच आकृती बंध मंजूर करत, नोकरभरतीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी होत होती. अखेर आता नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेल्या मागणीचे भूमीपुत्रांकडून स्वागत केलं जातं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रें म्हणाले की , कल्याण डोंबिवली महापालिकेत पहिल्यांदाच १९९९ भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. हजार पेक्षा अधिक पदांवर भरती होणार आहे. या भरतीमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध प्रल्पांमध्ये ज्या नागरिकांच्या , भूमीपुत्रांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत किंवा येथील भूमिपुत्र भूमिहीन झाले आहेत. अश्या लोकांना या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्याव. अशी विनंती मी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि केडीएमसी आयुक्तांकडे देखील करणार आहे. या नोकर भरतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भूमीपुत्रांच्या बाजूने आहे . आणि ही बाजू महापालिकेकडे आणि शासनाकडे मांडणार आहे. यामध्ये पाहिलं तर कल्याण डोंबिवली महापालिकेत मोठं मोठे प्रकल्प आले शेकडो एकर जमीन भूमीपुत्रांची बाधित झाली आहे. या नोकरीच्या प्रक्रियेत भूमीपुत्रांना प्राधान्यांने जे सुशिक्षित आमचे तरुण त्यांना प्राधान्य द्याव अशी आमची मागणी असल्याचे म्हात्रेंनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाच्या या मागणीचे भूमीपुत्रांकडून स्वागत केलं आहे. मात्र शासनाकडून आता या मागणीचा विचार होणार आहे का ? हे पाहणं देखील महत्वाचं झालं आहे.