ठाणे : जेसीबीच्या फटक्याने गॅसवाहिनी फुटली

रस्त्याचे काम सुरु असताना खोदकामावेळी गॅस वाहिनी फुटली; भाईंदर येथील घटना
 भाईंदर, ठाणे
भाईंदर पश्चिमेकडे सीसी रस्त्याचे काम सुरु असून त्याच्या खोदकामावेळी जेसीबीच्या फटक्याने गॅसवाहिनी फुटलीPudhari News network
Published on
Updated on

भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडे सीसी रस्त्याचे काम सुरु असून त्याच्या खोदकामावेळी जेसीबीच्या फटक्याने तेथील महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) कंपनीची गॅस वाहिनी फुटल्याची घटना सोमवार (दि.9) दुपारी 3.50 वाजताच्या सुमारास घडली.

मुख्य गॅस वाहिनी फुटल्यामुळे त्यातील प्रचंड प्रेशरमुळे मोठ्याप्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. यामुळे घाबरलेल्या आसपासच्या दुकानदारांनी पटापट दुकाने बंद करून प्रसंगावधान राखून तेथून बाजूला जाणे पसंत केले. या फुटलेल्या गॅस वाहिनीजवळ वाईन शॉपसह बार व विविध खाद्यपदार्थ तसेच गॅरेज असल्याने परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. यावेळी आसपासच्या एकाही व्यक्तीने एमजीएलच्या इमर्जन्सी तसेच कंपनीच्या फोन अथवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची तसदी घेतली नाही. जो तो आपले रक्षण करण्यासाठी तेथून पळ काढत होता. मात्र एका वाहनचालकाने प्रसंगावधान राखून पालिकेचे उपअभियंता यतीन जाधव यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जाधव यांनी तात्काळ एमजीएलच्या अधिकार्‍यांना संपर्क साधून त्वरीत गॅस पुरवठा खंडित करण्याची सूचना केली. यानंतर एमजीएल कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी परिसरातील गॅस पुरवठा खंडीत करून ज्याठिकाणी गॅस वाहिनी फुटली त्याठिकाणी धाव घेतली. दरम्यान फुटलेल्या वाहिनीतून वेगाने गॅस बाहेर पडू लागल्याने तेथील वाहतुक बंद करण्यात आली. तसेच कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हा क्रमांक सतत व्यस्त ठेवला जात होता. यावरून आपत्कालीन परिस्थितीत कंपनीचा इमर्जन्सी टोल फ्री क्रमांक कुचकामी ठरल्याचा प्रत्यय आल्याने हा टोल फ्री क्रमांक कंपनीने बंद करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली.

घराघरांमधील गॅस पुरवठा खंडित

सीसी रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने खोदकामापूर्वी तेथील अत्यावश्यक सेवेंतर्गत अंथरण्यात आलेल्या वाहिन्यांची माहिती घेऊन खोदकाम करणे अपेक्षित होते. मात्र अनेकदा त्याला बगल दिली जात असल्याने अत्यावश्यक सेवेंतर्गत अंथरण्यात आलेल्या वाहिन्या खोदकामामुळे क्षतिग्रस्त होऊन त्याचा फटका सामान्यांना बसत असल्याच्या घटना घडत असतात. येथील सीसी रस्त्याचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. तर यंदाही गॅस वाहिनी फुटल्यामुळे परिसरातील घराघरांमधील गॅस पुरवठा क्षतिग्रस्त वाहिनीच्या दुरुस्तीमुळे खंडित करण्यात आला. यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकाच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news