

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा करात अतिरिक्त शुल्क वाढ केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही करवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.
आठवडाभरापूर्वी उद्धव ठाकरे पक्षाने ही करवाढी मागे घेण्याच्या मागणीसाठी कल्याण महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. तर सोमवारी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा फुले रोडवर भरपावसात महापालिकेने पाठवलेली वाढीव कराची बिले जाळून केडीएमसीचा निषेध व्यक्त केला. ही शुल्क वाढ मागे घेण्यात यावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.
पश्चिमेतील शहर शाखेच्या बाहेरील महात्मा फुले रोडवर भर पावसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेने पाठवलेल्या वाढीव कराच्या बिलाची होळी करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख राहूल भगत, पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेवक सुधाकर वायकोळे, विधानसभा संघटक सुप्रिया चव्हाण, शहर संघटक अक्षरा पाटेल, प्रियंका विचारे, उपशहरप्रमुख संजय पाटील, शाम चौगुले, विभाग प्रमुख प्रमोद कांबळे, उपविभाग प्रमुख भावेश पवार, शाखाप्रमुख सचिन जोशी, सूरज पवार, आकाश पाटील, राजेश पाटील, मंगेश सरमाळकर, आदी पदाधिकार्यांसह महिला आघाडी आणि युवासैनिक तसेच अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.