पालघर : समाज माध्यमाद्वारे विविध लिंक पाठवून रिव्ह्यू किंवा रेटिंग दिल्यास नफा होईल या संदेशाखाली तुमचीही आर्थिक फसवणूक होऊ शकते. हो, असाच प्रकार बोईसर पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत घडला असून या नफ्याच्या आमिषाखाली एका 26 वर्षीय तरुणाची तब्बल 18 लाख 81 हजार 85 रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रिव्ह्यू व रेटिंगच्या नावाखाली तीन जणांच्या टोळीने हा गंडा घातला असून याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार बोईसर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत 27 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
तिघाजणांनी मोबाईलमधील समाज माध्यमांचा वापर करून महागाव कुकडे येथील कुमार हर्षल पाटील यांची फसवणूक केली आहे. एका दिव्या नामक महिलेने पाटील यांच्या मोबाईलवरील एका समाजमाध्यम समूहावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ट्रेडिंग ऑनलाईन जॉबचा संदेश पाठवला. याद्वारे पाटील यांच्याकडून वैयक्तिक व बँकेची माहिती घेतली.
तीन जणांच्या टोळीतील दिव्या या महिलेने माहिती घेतल्यानंतर तिचा साथीदार याने पाटील यांच्या समाज माध्यम समूहावर एका कामाची माहिती व बँकेसंदर्भातील माहिती देऊन वेगवेगळ्या वस्तूंबाबत रिव्ह्यू व रेटिंग दिल्यास चांगले कमिशन मिळेल असे, आमिष दाखवले. त्यानंतर या टोळीने पाटील यांना लिंक पाठवली व त्याद्वारे पाटील यांच्या मोबाईल क्रमांकाचे ट्रेडिंग खाते ओपन केले. टोळीतील व्यक्तीने समाज माध्यमाद्वारे पाटील यांच्याकडे पैसे भरण्यास सांगितले. टास्कसाठी पैसे द्यावे लागतील अशी मागणीही या टोळीने पाटील यांच्याकडे केली व चांगला नफा देऊ असे सांगितले.
नफ्यापोटी टोळीने वेळोवेळी दिलेल्या कामांसाठी पाटील यांनी 18 लाख 81 हजार 85 रुपये इतकी रक्कम ऑनलाईनद्वारे विविध खात्यांवर भरली. ही रक्कम दिल्यानंतर पाटील यांनी दिलेल्या कामाचे रिव्ह्यू रेटिंग केल्यानंतरही आपले मूळ पैसे व नफा मिळत नसल्याने यात काहीतरी गडबड आहे, असा संशय आला. त्यानंतर त्यांनी ट्रेडिंग खाते पाहिले असता या टोळीने ते बंद केले होते. यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे समजताच पाटील यांनी फसवणूक झाल्याबाबतचा ऑनलाईन अर्ज पोलिसात दिला. त्यानुसार बोईसर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तर भारतीय न्याय संहितेच्या कलमाप्रमाणे या टोळी विरोधात शुक्रवारी (दि.27) रोजी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत पोलिसांनी विविध पथके स्थापन केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

