

Paddy Fields waterlogging Kalyan East
नेवाळी : कल्याण पूर्वेतील मलंगगड पट्ट्यात सोमवार पासून मुसळधार पावसाची संततधार सुरु आहे. मंगळवारी मलंगगडच्या नदीने रौद्ररूप धारण केल्यानंतर आता शेतकरी चिंतेत पडला आहे. नदीच्या पाण्याने आजूबाजूच्या परिसरातील भात शेतात प्रवेश केल्याने पीक पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. श्री मलंगगड भागात पावसाची संततधार सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
कल्याण पूर्वेतील मलंगगड पट्ट्यात भात लागवडीची काम पूर्ण झाली आहेत. परिसरात यंदा लक्षणीय भात पिकाची लागवड झाली आहे. मात्र, लागवड झाल्यानंतर आता सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोमवारपासून कोसळणाऱ्या धो धो पावसाच्या धारांनी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या ,नाल्यांची देखील रौदय रूप धारण केलेलं असताना आता त्यामधील पाणी थेट भात शेतात प्रवेश करू लागला आहे. अंबरनाथ तालुक्यातील ढोके गावाच्या हद्दीत असलेल्या भात शेतात पुराच्या पाण्याने प्रवेश केला आहे. सह्याद्रीच्या डोंगराळ भागात पावसाची संततधार सुरूच असल्याने नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे पावसाची संततधार अशीच सुरु राहिल्यास लागवड केलेली भात पीक पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.